त्र्यंबकेश्वरला गर्दी वाढताच दर्शनाचा ‘धंदा’, एका भाविकासाठी दोन हजारांची मागणी, मंदिरात टोळी सक्रिय

Khozmaster
2 Min Read

 त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी उसळली असून, शनिवार-रविवारी भाविकांच्या संख्येचा उच्चांक गाठला जात आहे. गर्दी वाढताच दोनशे रुपये थेट दर्शनाची तिकीट विक्री बंद करण्यात येते. याचा फायदा घेत देवदर्शनाचा धंदा करणारी टोळी सक्रिय झाली आहे. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विश्वस्त स्वप्नील शेलार यांच्यासमोरच हा प्रकार उघड झाला.गर्दी झाली म्हणून पाहणी करताना उत्तर दरवाजाला फेरफटका मारत असताना गुजरातमधील ११ भाविकांचा जथा घोळक्याने उभा असल्याचे आणि दर्शनासाठी जाता येईल का, अशी चर्चा करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या भक्तांशी संवाद साधला असता त्यांनी आम्ही दोनशे रुपये दर्शनबारीत उभे राहण्यासाठी जात होतो. मात्र, ती बंद ठेवल्याचे सांगण्यात आले. काही व्यक्तींनी तुम्हाला दर्शनासाठी जायचे का, अशी विचारणा करीत प्रत्येकी दोन हजार रुपये लागतील असे सांगितले. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीला विश्वस्त शेलार यांच्यासमोर उभे केले. यावर शेलार यांनी त्या व्यक्तीला तंबी देत यापुढे असा प्रकार घडायला नको, असे बजावले.गुजरातमधील त्या भाविकांनी देवस्थान ट्रस्टला ११ हजार रुपये देणगी दिली. यावेळी भाविकांनी ट्रस्ट एका भाविकाचे पाच हजार रुपये घेणार असेल तरी आम्ही देण्यास तयार आहोत. मात्र, अशा प्रकारे देवदर्शनाचा धंदा करणाऱ्यांना पैसे देणार नाही, असा निर्धार केला. त्यानंतर शेलार यांनी दोनशे रुपये दर्शनबारी तिकीट दरवाजा रांगेतील भाविकांसाठी खुला ठेवला व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे रक्षक उभे असतात, तो दरवाजा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर थेट दर्शनासाठी वशिला लावणारे भाविक संस्थान इमारत कार्यालयाच्या दोन्ही दरवाजांना गर्दी करीत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे व्हीआयपी दर्शन बंद असतानाही ओळखीच्या व्यक्ती संस्थान कार्यालय इमारतीच्या दरवाजांनी भाविकांना सोबत घेऊन आत येताना दिसत असल्याने भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.पोलिसाचा प्रामाणिकपणा

येथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला गुजरातच्या भाविकांनी तुम्हाला एक हजार रुपये देतो, आम्हाला आत सोडता का, असे विचारले. त्यावर तुम्ही दहा हजार रुपये दिले तरी थेट आत जाता येणार नाही. तुम्ही रांगेत उभे राहा, अशी त्याने विनंती केली. यावर भाविकांनी पोलिसाचा प्रामाणिकपणा पाहून त्याची प्रशंसा केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *