नाशिकच्या निफाडमध्ये शिवशाहीला भीषण आग,छत्रपती संभाजीनगर मार्गावर बस पेटली, चालकाची सतर्कता अन् प्रवासी बचावले

Khozmaster
2 Min Read

नाशिकः जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. या बसने अवघ्या काही वेळातच पेट घेत रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आगीच्या ज्वाला या उंच उंच पसरू लागल्या होत्या. चालत्या बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक – छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर हा निफाड तालुक्यात असलेल्या शिंपीटाकळी फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस (क्र. एम एच ०९ एफ एल ०४७७) ही बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना आज दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या बसमध्ये इंजिनच्या बाजूने धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला थांबवत बसमधील सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. त्यानंतर धूर येण्याचे प्रमाण वाढू लागले आणि बसने काही क्षणातच पेट घेतला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तसेच काही स्थानिकांच्या वतीने त्या ठिकाणी मदत कार्य राबविण्यात आले. उपस्थित नागरिकांकडून या ठिकाणी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला आणि या आगीत ही संपूर्ण बस भक्षस्थानी पडली. या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.यापूर्वी देखील नाशिकमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शिवशाही या बसला आग लागल्याची घटना घडली. मात्र, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, चालत्या बस मधून धूर निघत असल्याने बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *