कृषिमंत्री झालो, समोर आलेली पहिलीच फाइल अस्वस्थ करणारी होती, पवारांनी सांगितली आठवण

Khozmaster
1 Min Read

मुंबई : ‘आपला देश कृषिप्रधान देश असल्याचे आपण बोलतो, पण मी कृषिमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्याकडे पहिलीच फाइल ही ब्राझीलमधून अन्नधान्य आयात करण्याबाबत आली होती. ती फाइल ज्यावेळी माझ्याकडे आली तेव्हा मी अस्वस्थ झालो होतो,’ अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुंबईत जागवली.

त्याचवेळी कृषीक्षेत्रातील संशोधकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पुढील पाच ते सहा वर्षांत ही परिस्थिती बदलली. आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

पवार यांच्या हस्ते शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिक्षण, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचे त्यांनी अभिनंदनही केले.‘आपला देश हा कृषिप्रधान आहे. शेतीच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. आपला देश स्वत:ची गरज भागवून जगातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करत आहे,’ असे पवार यांनी नमूद केले. तर साहित्याच्या क्षेत्रात नवनवीन लेखक येत आहेत. इतरांना प्रेरीत करत आहेत. हे चित्र पुणे-मुंबईपर्यंत नाही, तर महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण वाचायला मिळते, असे ते म्हणाले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *