चुकीला माफी नाही! रेशन धान्य विकणाऱ्यांना बसणार लगाम, हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय

Khozmaster
2 Min Read

नागपूर : ‘रेशन धान्याची मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारात विक्री होते. गरज नसतानाही तांदूळ लाभार्थ्यांना वितरित केला जातो. हाच तांदूळ खुल्या बाजारात विकला जातो. राज्यात वेगवेगळ्या भागांत अशा घटना पुढे आल्या आहेत’, असा मुद्दा आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. ‘खुल्या बाजारात रेशन धान्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ‘मटा’ने हा मुद्दा उपस्थित केला होता.

गोंदिया जिल्ह्यात शासन मान्यतेविना तांदळाची उचल केल्याचा मुद्दा आमदार जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. रेशन दुकानात मिळणाऱ्या तांदळाचा दर्जाही निकृष्ट दर्जाचा असतो. कुठेही तपासणी केली जात नाही. ७० ते ८० टक्के तांदूळ अपात्र ठरेल, अशी स्थिती आहे. धान्य वाहतूक करण्यातही अतिरिक्त खर्च केला जातो, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

‘पूर्व विदर्भातील जिल्ह्यात तांदूळ पिकतो. राज्यातील गरजेनुसार त्याची निर्यात केली जाते. मार्चपासूनच गोंदियाचा सीएमआर नगरला जोडण्यात आला होता. ८६ हजार क्विंटलची आवश्यकता होती. तांदूळ बरोबर वितरित झाला. इथे कुठेही तक्रार आली नाही. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून गुणवत्तेची तपासणी करण्यात येते’, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पोलिसांचे गुन्हे दाखल झाले आहे. कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.दलाल सक्रिय

धान्य वितरणात दलाल सक्रिय होतात. राज्याच्या तिजोरीवर भार येत आहे. सुतळी खरेदीतही भ्रष्टाचार होतो. वाढलेला भ्रष्टाचार केव्हा थांबणार, असा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला. १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ दिला जातो. हाच तांदूळ पुन्हा व्यापाऱ्यांकडे येतो. हा काळाबाजार थांबविण्यासाठी काय प्रयत्न होणार, असा मुद्दा आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. अमरावतीत ५० लाखांच्या वर तांदूळ पकडला गेला. हा प्रश्न राज्यव्यापी आहे, असेही ठाकूर म्हणाल्या.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *