तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
देऊळगाव राजाचे ग्रामदैवत व प्रती तिरुपति म्हणून ख्याती असलेल्या श्री बालाजी महाराजांचा कार्तिक लळित उत्सव दि. १० डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी नियोजित वेळेत काल्याच्या कीर्तनानंतर भक्तिमय वातावरणात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आश्विन महिन्यात घटस्थापनेपासून श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. दरम्यान मंडपोत्सव, पालखी मिरवणूक, लळित असे विविध धार्मिक उत्सव आनंदमय वातावरणात पार पडले. श्री बालाजी महाराजांचा यात्रा महोत्सव दरवर्षी दोन टप्प्यांमध्ये पार पडतो. पहिला टप्पा आश्विन शुद्ध १ ते आश्विन कृ.४ या आश्विन यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्राच्या व भारताच्या कान्याकोपर्यातून लाखो भाविकभक्त उपस्थित राहतात.
यात्रेचा दूसरा टप्पा कार्तिक यात्रा उत्सवाला दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरुवात झाली. या दिवशी मंडपोत्सव संपन्न झाला. या मंडपोत्सवासाठी १६ कापडी मंडप उभारण्यात आले. दि. २५ नोव्हें. रोजी श्रींच्या मंदिरासमोर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. श्री बालाजी संस्थानच्यावतीने मंदिरासमोर स्टीलच्या कठड्यांवर दिव्यांची आरास ठेऊन रोषणाई करण्यात आली. हा दीपोत्सव कार्तिक लळितोत्सवापर्यंत रोज चालू होता. श्रींच्या दर्शनासाठी येणारे भक्त विशेषत: महिला दिव्यांमध्ये तेल घालून दिवे प्रज्वलित ठेवीत होत्या. त्यामुळे मंदिरासमोरील वातावरण तेजोमय राहत होते.
दरम्यान महाद्वाराजवळील मारोतीच्या बैठकीवर दि. २६ नोव्हेंबर रोजी गोंधळी मंडळाने पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम सुरू केला. दि.१० डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी नियोजित वेळेत ह.भ.प. जयंतबुवा हरदास यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात गवळी समाजातर्फे दहीहंडी फोडून कार्तिक लळीत पार पडले. नंतर ब्राम्हणवृंदांनी डोक्यावर दिवा घेऊन श्री बालाजी मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर टाकळकरांनी लाह्या बत्तासे प्रसाद वाटप केला व पुजारीवृंदांनी बर्फीचा प्रसाद वाटप केला.
यावेळी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब, श्री. बालाजी संस्थानचे व्यवस्थापक किशोर बीडकर, आशिष वैद्य, संस्थानचे कर्मचारी, मोठ्या संख्येने ब्राम्हणवृंद व भाविक उपस्थिती,
मा. संपादक / पत्रकार
दैनिक / साप्ताहिक,
कृपया वरील बातमीस आपल्या लोकप्रिय दैनिकात / साप्ताहिकात प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.