उरुळी कांचन : पोटगी व मुलीचा ताबा यासाठी कोर्टात चालली केस सासू मागे घेत नाही याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चाकूने वार केल्याची घटना नायगाव (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.
या घटनेत अलका विठ्ठल गवळी (वय ५०, रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली) या गंभारी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (वय २८, रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली, मूळ गाव रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोडनिंब ता. म्हाडा, जि. सोलापूर)
यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संग्राम बळवंत शिंदे (वय ३८ वर्ष, रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोडनिंब ता. म्हाडा, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपाली शिंदे या त्यांच्या आई अलका गवळी यांच्यासोबत नायगाव येथे राहतात. फिर्यादी रुपाली यांची पोटगी व मुलीचा ताबा मिळण्यासाठी कोर्टात केस चालू आहे.
आरोपी संग्राम शिंदे हा बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडे पाच वाजता नायगाव येथील त्यांच्या सासूच्या घरी आला. तो त्याची पत्नी रुपाली यांना म्हणाला ‘ केस मागे घे’, यावर ‘जे काही होईल ते कोर्टात होईल’, असे रुपाली म्हणाल्या.
त्यावेळी संग्राम याने टिफिनच्या पिशवीतून आणलेला धारधार चाकू काढत ‘तुला जीवानिशी सोडणार नाही’ असं म्हणत अंगावर धावून गेला त्यावेळी रुपाली यांची आई अलका गवळी मध्ये आल्याने ‘तुझ्यामुळेच सगळे होत आहे तूच केस मिटवू देत नाही तुलाच खल्लास करतो असे म्हणत अलका यांच्या पोटात तीन वेळा चाकू घुसवून त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केले त्यात त्या गंभारी जखमी झाल्या. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
Users Today : 0