1889-90चा ब्रिटिश कालीन रस्ता वनविभागाने खुला करावा; मेदनकरवाडी ग्रामपंचायतची मागणी

Khozmaster
2 Min Read

Chakan News: ब्रिटिश कालीन 1889- 90 च्या कागदपत्रानुसार अस्तित्वात असलेल्या नकाशात मेदनकरवाडी ते आळंदी रोड असा मार्ग जुन्या बॉम्बे फॉरेस्ट चा नकाशात आहे. तो नकाशा मेदनकरवाडी ग्रामपंचायतकडे आहे.

त्यानुसार हा रस्ता वनविभागाने खुला करावा. त्यामुळे रस्त्यावरून ये -जा करता येईल. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, ग्रामविकास अधिकारी सुदाम कड, सदस्य विजय मेदनकर,गणेश भुजबळ यांनी व इतरांनी केली आहे.

चाकण,ता.खेड येथील औद्योगिक वसाहतीमुळे जुन्या पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण= शिक्रापूर, चाकण -तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने कामगार वर्ग तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.

चाकणचा ग्रामपंचायत परिसर हा पीएमआरडीएच्या हद्दीत येत असून पीएमआरडीएचेही नव्याने रस्ते करण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे नागरिक, कामगार वैतागले आहेत. हद्दीतील प्रस्तावित असलेला रासे फाटा,कडाचीवाडी, मेदनकरवाडी, आळंदी फाटा हा रस्ता पीएमआरडीएने अनेक वर्षापासून लाल फितीत अडकवला आहे.

या मार्गाचे काही काम होत नाही.त्यामुळे वाहतूक कोंडीला पर्यायी रस्ता होत नाही. त्यामुळे मेदनकरवाडी व परिसरातील नागरिकांचा पीएमआरडीवर आरोप आहे.ब्रिटिश कालीन 1889- 90 च्या नकाशामध्ये चाकण वन विभागाच्या हद्दीतून जाणारा मेदनकरवाडी ते जुना आळंदी रोड अस्तित्वात होता.

या आळंदी मार्गाने जुन्याकाळी वारकरी, भाविक व इतर लोकांची ये, जा होत होती.आळंदी यात्रेच्या काळामध्ये तसेच एकादशीच्या वेळेस वारकरी मोठ्या प्रमाणात दिंड्या घेऊन या मार्गाने जात होते. या मार्गावर ज्ञानेश्वर महाराज कालीन पादुकाही आहेत.

त्यामुळे हा दिंडी मार्ग सुद्धा होता. हा दिंडी मार्ग वनविभागाने खुला करावा अशी मेदनकरकवाडी ग्रामपंचायतची अनेक वर्षापासून ची मागणी आहे.परंतु वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.1889 -90च्या ब्रिटिशकालीन नकाशा मध्ये अस्तित्वात असलेला मार्ग खुला करण्यात यावा यासाठी मेदनकरवाडी ग्रामपंचायतीने संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे.

हा रस्ता खुला झाला नाही तर मेदनकरवाडी ग्रामपंचायती च्यावतीने आंदोलन करण्यात येईल. हा जुना दिंडी मार्ग आहे. वनविभागाने या मागणीकडे त्वरित लक्ष द्यावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, सदस्य विजय मेदनकर,अमित मेदनकर, संभाजी मेदनकर, गणेश भुजबळ व इतरांनी दिला आहे.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *