कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील दोन्हीही विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) या दोन्हीही जागा शिंदे गटाकडेच असतील आणि दोन्ही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल’, असा दावा माजी मंत्री व शिवसेना संपर्कप्रमुख विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला.शिवतारे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मंगळवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिवतारे म्हणाले, ‘शिवसेनेत पुर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक अशी यंत्रणा होती. त्यातून सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला न्याय मिळत होता. आता ही परिस्थिती बदलली आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून आम्ही दूर जाऊ लागलो. परिणामी मुख्यमंत्री शिंदे यांना वेगळा विचार करावा लागला. सर्वसामान्य माणूस, पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी नाळ जुळलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच आता ते मुख्यमंत्रीपदावर असल्यानंतर आपण पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले पाहीजेत.’ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा व विधानसभेच्या किमान सहा जागा जिंकण्याचे नियोजन करावे लागले. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांतही पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहीजे.’ यावेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रविंद्र माने यांनी शिवतारे यांचे स्वागत केले. उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, रणजित मंडलिक, युवा सेनेचे निशिकांत पाटील, संदीप ढेरे, भाऊसाहेब आवळे, रूपाली चव्हाण, वैशाली डोंगरे, अजित सुतार आदी उपस्थित होते.
Users Today : 23