विचित्र योगायोग! 2001 मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला अन् आता..; धैर्यशील मानेंनी सांगितला ‘मातोश्रीं’बाबत थरारक अनुभव

Khozmaster
2 Min Read

संसदेचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून कसे दिसते, हे पाहण्यासाठी मी काही मित्रांसोबत काल गॅलरीत बसलो होतो. त्याच गॅलरीच्या पहिल्या रांगेत ‘ते’ दोघे बसलेले होते. काही वेळाने सुरक्षारक्षकांनी या गॅलरीतील एक रांग रिकामी करण्यासाठी लोकांना उठवले. त्यावेळी ‘त्या’ दोघांची चुळबूळ सुरू झाली होती. गॅलरीतील एक रांग रिकामी झाली आणि काही कळायच्या आत यापैकी एकाने गॅलरीतून थेट संसदेत उडी घेतली. पहिल्यांदा हा दहशतवादी हल्लाच वाटला, अशा शब्दात लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती सांगितली.माने (Dhairyasheel Mane) म्हणाले, ‘‘माझे काही पुण्याचे मित्र संसदेचे कामकाज पहायला आले होते. त्यांना मी पास दिला. मीच सोबत असेल तर त्यांना लवकर आत सोडले जाईल म्हणून त्यांना घेऊन गेलो. मलाही गॅलरीतून कामकाज कसे दिसते, याची उत्सुकता होती. ते दोघे पहिल्या रांगेत तर मी व माझे मित्र तिसऱ्या रांगेत होतो. एका व्यक्तीला ४५ मिनिटेच गॅलरीत बसता येते. या नियमाने सुरक्षारक्षकांनी दुसरी रांग रिकामी करण्यास सुरुवात केली, त्यावेळी दोघेही चुळबूळ करू लागले; पण त्यावेळी लक्षात आले नाही.’’

काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे भाषण झाल्यानंतर या दोघांपैकी एकाने काही कळायच्या आत गॅलरीतून थेट संसदेत उडी घेतली. त्यानंतर दुसराही उडी मारण्याच्या प्रयत्नात गॅलरीलाच लटकला. प्रचंड सुरक्षा व्यवस्था असतानाही तरुण आत आल्याने संसदेत एकच गोंधळ (Parliament Security Breach) उडाला. त्यात पहिल्यांदा उडी मारलेल्या तरुणाने पायातील बूट काढून त्यातील काही वस्तू काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

या बुटात बंदूक किंवा बॉम्बसदृश काही असेल, या भीतीने सुरक्षारक्षकांनी संसदेसह गॅलरीही रिकामी केली. सुरुवातीला मला हा आतंकवादी हल्लाच वाटला; पण नंतर त्या तरुणाने बुटातून स्प्रे काढला. तो सगळीकडे मारल्यानंतर त्याचा फटक्यासारखा वास घशात गेल्याने अनेकांना त्रास होऊ लागला. नंतर सुरक्षरक्षकांनी त्यांना पडकले.’’ पण या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही समोर आल्याचे श्री. माने म्हणाले.

विचित्र योगायोग!

संसदेवर १३ डिसेंबर २००१ मध्ये आतंकवादी हल्ला झाला होता. त्यावेळी श्री. माने यांच्या मातोश्री श्रीमती निवेदिता माने खासदार होत्या आणि त्या सभागृहात जात असतानाच हा हल्ला झाला होता. सुरक्षा रक्षकांकडून त्यांना दरवाजावरच थांबवण्यात आले होते. आज २२ वर्षांनी पुन्हा तसाच प्रकार नसला तरी संसदेत घबराट निर्माण होणारा प्रकार झाला, त्यावेळी माने स्वतः सभागृहात उपस्थित होते.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *