वारंवारच्या गावबंदीवर कायमचा तोडगा! पोलिसांच्या मदतीने सरपंच अन्‌ गावकऱ्यांकडून कौतुकास्पद निर्णय

Khozmaster
2 Min Read

वेळापूर : छोट्या-मोठ्या कारणांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय तेढ निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार गावबंद आंदोलन करून नागरिकांसह व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणत्याही समूहास नाही. त्यामुळे वारंवार होणारे वेळापूर (ता. माळशिरस) गावबंद आंदोलन कायमचे बंद करा, असा निर्णय वेळापूर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या शांतता सभेच्या प्रसंगी उपस्थित सर्वच समूहाच्या प्रतिनिधीकडून घेण्यात आला.वेळापूर (ता. माळशिरस) ग्रामपंचायत, वेळापूर पोलिस स्टेशन यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. स्वाती भोरे-पाटील यांच्या उपस्थितीत वेळापूरमध्ये सतत जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना थांबवून गावात शांतता सलोखा राखून ठेवण्यासाठी सर्वपक्षीय, सर्व समुदाय प्रतिनिधींच्या शांतता बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी सपोनि नीलेश बागाव, सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. भोरे पाटील यांनी जिथे कायदा काम करू शकत नाही तिथे नैतिकता काम करते ही जबाबदारी सर्व समाज घटकांची आहे. प्रत्येक समाजाच्या स्वतंत्र अस्मिता आहेत, त्याचा आदर सर्वांनी करावा.

वारंवार असभ्य लोक निर्लज्ज होतात आणि सभ्य लोक पुढे येण्यासाठी लाजतात असे सांगून गावाबाहेरील लोक गावात येऊन शांतता बिघडविण्याची हिंमत करीत असतील तर कायदा आपले काम करेल असा इशाराही दिला. प्रारंभी सरपंच रजनीश बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचे औचित्य सांगितले.

गावकरी म्हणाले…

  • विनायक माने : सर्वांच्या अस्मितेचा आदर व्हावा.
  • रायचंद खाडे: शांतता कमिटीची दरमहा बैठक व्हावी.
  • मिलिंद सरतापे: वेळापूर बाहेरून येऊन शांतता भंग करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांना पोलिसी खाक्या दाखवा.
  • सुनील जाधव: एका व्यक्तीने चूक केल्यास त्याच्या संपूर्ण जाती धर्माला वेठीस धरू नये.
  • संदीप कदम: आरोप-प्रत्यारोपाकडे दुर्लक्ष करू.
  • जावेद मुलाणी: चूक एकाची असेल तर समुदायाला बदनामीकारक बोलू नये.
  • प्रदीप सरवदे: अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. प्रशासन सक्षम नाही.
  • बाळासाहेब धाईंजे: गोरक्षा नावाखाली होणारी मारहाण आणि दहशत थांबवावी. त्याबाबत गोवंश हत्या बंदी कायदा समजावून सांगावा

गोवंश हत्या बंदीबाबत खुलासा म्हैस वर्गातील प्राणी वगळता सर्व प्रकारच्या देशी, जरशी गाई तसेच त्यांची वासरे यांची खाटीकखान्याला विक्री, हस्तांतरण करण्यास बंदी आहे.

– डॉ.स्वाती भोरे.

गावात शांतता कमिटीची स्थापना करण्यात येईल. गावामध्ये काहीही झाले तरी शांतता व सलोखा राखण्याची आवश्यकता आहे. याबाबत सर्वच समाजातील समूहातील नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.याबाबात आम्ही दक्षता बाळगू.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *