चेंबर खचल्याने बस अडकून वाहतुकीचा खोळंबा

Khozmaster
2 Min Read

जुनी सांगवी,  नवी सांगवी फाटा ते घोलप महाविद्यालय कॉर्नर मुख्य रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम सुरू आहे. मुख्य रस्ता असल्याने नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडीकरांना येथून ये-जा करण्यासाठी एकेरी व पर्यायी रस्त्याचा वापर करत वळसा घालून मार्गक्रमण करावे लागते आहे. यातच ठेकेदाराने केलेल्या नवीन रस्ता कामात चेंबर खचून बुधवारी (ता. १३) सकाळी साडेनऊच्या सुमारास एक बस अडकून पडल्याने नागरिकांची दुतर्फा झालेल्या वाहतूक कोंडीने तारांबळ उडाली. यात चाकरमानी मंडळी, विद्यार्थी, रुग्णांची परवड झाली. यामुळे या कामाबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आधीच कासव गतीने सुरू असलेले काम व दर्जाहीन चेंबरमुळे नागरिकांमधून काम दर्जेदार करण्याची मागणी होत आहे. विकासकामे करताना महिनोंमहिने नागरिकांना एकेरी वाहतूक, खोदकामाची धूळ-मातीचा त्रास सहन करावा लागतो. विकासकामांचा हा त्रास नागरिक सहन करत असतात. मात्र, त्यात होणाऱ्या चुकीच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास, अपघातांच्या घटनांना सामोरे जावे लागते. यास जबाबदार कोण? प्रशासन व व्यवस्थापनाने याबाबत हलगर्जीपणा करू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. तासभर खोळंबलेली वहातूक कोंडी अखेर स्थापत्य विभागाकडून क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करून सुरळीत करण्यात आली. मात्र, चाकरमानी मंडळी, विद्यार्थी, उद्योजक, रुग्ण यांना आपापल्या स्थळी पोचण्यासाठी उशीर झाला.

याबाबत स्थापत्य विभागाशी संपर्क साधला असता, चेंबरवरील लोखंडी झाकणे चोरीला जात असल्याने येथे सिमेंट कॉंक्रिटची चेंबरला झाकणे लावली आहेत, असे सांगण्यात आले. तर जड वाहने सिमेंटच्या झाकणावरून जाऊन ती खचत असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काम दर्जेदार करावे, अनपेक्षित संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.

‘‘सकाळी कोंडीत अडकल्याने कामावर जायला उशीर झाला. काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. चेंबर खचून मोठा अपघात झाला असता.’’
– संजय गायकवाड, नागरिक

‘‘येथील सर्व चेंबरच्या दुरुस्त्या करण्यात येत आहेत. आवश्यक सूचनांचा विचार करून काम दर्जेदार गुणवत्तापूर्ण करण्यात येईल.’’
– जयकुमार गुजर, अभियंता, स्थापत्य विभाग

0 9 3 8 6 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *