भोसरी, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला स्नेह संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड शहरासह शहराबाहेरीलही शाळांची पसंती मिळत आहे. संमेलनासाठी नाट्यगृह फेब्रुवारी महिन्यापर्यंत ‘हाऊस फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या उत्पन्नातही भर पडत आहे.कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह पुणे-नाशिक महामार्गालगत आहे. त्यामुळे रसिकांसाठी नाट्यगृहात पोहचण्यास अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे नाट्यगृहात साडेनऊशे आसने आहेत. शहरात सर्वाधिक आसन क्षमतेत या नाट्यगृहाचा दुसरा क्रमांक लागतो. ऐसपैस पार्किंगचीही सुविधा मोफत आहे. शाळांच्या कार्यक्रमासाठी नाट्यगृहाच्या भाडे दरातही सवलत दिली जाते. त्यामुळे शाळांची पसंती या नाट्यगृहाला असल्याची माहिती नाट्यगृहाचे व्यवस्थापक दिलीप फुगे यांनी दिली.कै. लांडगे नाट्यगृहात भोसरीसह चिंचवड, पिंपळेगुरव, चिखली, चऱ्होली, दिघी, मोशी, इंद्रायणीनगर आदी शहरातील उपनगरासह वाघोली, सुदुंबरे, कामशेत, मोई, चिंबळी, कुरोळी, आळंदी, चाकण, खरपुडी. भोपाळ युनिर्व्हसिटी आदी शहराबाहेरील गावांमधील शाळांच्या स्नेह संमेलनाने लांडगे नाट्यगृह बुक झाले आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत १५१ शाळांनी स्नेह संमेलनासाठी नाट्यगृह आरक्षित केले आहे.
अशी आहेत शाळांची स्नेह संमेलने
महिना-स्नेहसंमेलनांची संख्या
नोव्हेंबर-१५
डिसेंबर-४४
जानेवारी-४७
फेब्रुवारी-४५
एकूण-१५१
नाट्यगृहात उपहारगृहाचा अभाव
कै. लांडगे नाट्यगृह २०११ मध्ये सुरू झाले. मात्र, तेव्हापासूनच या नाट्यगृहाला उपाहारगृहाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे स्नेह संमेलन घेणाऱ्यांनाच येथे उपाहारगृहाची तात्पुरती सोय करावी लागते. त्यामुळे या नाट्यगृहात उपाहारगृहाची सोय करण्याची मागणी श्रोते आणि शाळांची आहे.मार्च महिन्याच्या बुकिंगची प्रतीक्षाकै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मार्च महिन्यासाठीच्या कार्यक्रमासाठी अद्यापही बुकिंग सुरू झाले नसल्याचे पिंपळे गुरवमधील एका शाळेच्या व्यवस्थापकाने सांगितले. मात्र मार्च महिन्यासाठी लांडगे नाट्यगृहाचे बुकिंग नुकतेच सुरू करण्यात आल्याची माहिती नाट्यगृह व्यवस्थापनाने दिली. हे बुकिंग ऑनलाइन करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.‘‘कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला पार्किंगची प्रशस्त सोय आहे. त्याचप्रमाणे हे नाट्यगृह रस्त्याच्या कडेला लागून आहे. त्यामुळे नवख्या माणसांना शोधाशोध करावी लागत नाही. आमच्या विद्यापीठाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठीही हे नाट्यगृह सोईस्कर आहे. मात्र, सध्या नाट्यगृहातील बंद असलेली एसी सुरू होणे गरजेचे आहे.’’
– सौमित्र नायक, सहायक प्राध्यापक, युनिव्हर्सिटी, भोपाळ
‘‘कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरीतील मुख्य रस्त्याला लागून असल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी सोईस्कर आहे. चाकणकरांसाठी हे नाट्यगृह सर्वात जवळचे आहे. त्यामुळेही सोईस्कर आहे. त्याचप्रमाणे येथे सोईसुविधा चांगल्या आहेत.’’
– निकीता खांडेभराड, व्यवस्थापन संचालक, पी. के. फाउंडेशन स्कूल, चाकण
Users Today : 5