देहूरोड, : ‘‘मूलभूत नागरी सुविधा पुरवत असताना कुठे कमतरता राहत असेल; तर नागरिकांनी आपल्या भागातील तक्रारी व सूचना पाठवाव्यात. त्यावर, तातडीने कार्यवाही केली जाईल. स्वच्छतेला प्राधान्य देऊन वॉर्ड निहाय सर्व उपहारगृहे, रेस्टॉरंट, स्वीट होम व अन्य खाद्य दुकानांची नियमित तपासणी केली जाईल’’, असे देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांनी स्पष्ट केले.
देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे रावत यांनी नुकतीच स्वीकारली. विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधले असता त्यावेळी त्या बोलत होत्या.
रावत म्हणाल्या, ‘‘कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून मूलभूत नागरी सुविधा पुरविताना नागरिकांच्या काही तक्रारी असतील; तर गुगलमध्ये देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्च करावे. त्यातील eChhawani वर लॉग इन करून आपल्या भागातील तक्रारी व सूचना पाठवाव्यात. त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. कॅन्टोन्मेंट हद्दीतील भागांची लवकरच पाहणी केली जाईल. कॅन्टोन्मेंट संबंधित विभागांशी संबंधित नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.’’
महाराष्ट्रात प्रथमच कामाची संधी
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रथमच प्रशासकीय सेवा करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी काम केलेल्या ठिकाणांच्या तुलनेत देहूरोडमधील लोकांमध्ये सहकार्याची भूमिका असल्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे, देहूरोडमध्ये प्रशासकीय सेवा बजावत असताना स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षाच्या लोकांना विश्वासात घेतले जाईल, असे रावत यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील समस्या –
– कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडून ठेकेदार कंपनीवर महिन्याला ४० लाखांचा खर्च
– मात्र, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग
– त्यामध्ये, देहूरोड सेंट्रल जवळील साईनगरकडे जाणाऱ्या वनराईतील रस्ता, मामुर्डी येथे शितळानगर ते मामुर्डी गावठाण रस्ता, पुणे-मुंबई महामार्गावरील चर्च, वैश्य समाज मंदिर, मंडई, चिंचोली प्राथमिक शाळेसमोर व पुणे गेट हॉटेलपासून दत्तनगरकडे जाणारा रस्ता, देहूरोड येथे आंबेडकर रस्ता आदी ठिकाणांचा समावेश.
– देहूरोड बाजारपेठेतील पी-१, पी-२ अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
– कॅन्टोन्मेंट व्यापारी संकुलातील गैरसोयी, अधिक युनिटचे स्वच्छतागृहाची गरज
– पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड सेंट्रल ते शंकरवाडीपर्यंत बंद अवस्थेतील विद्युत खांब
Users Today : 5