Winter Season: बुधवारी देशाच्या संसदेत सभागृहाच्या आत आणि बाहेर गदारोळ झाला. लोकसभेतील व्हिजिटर्स गॅलरीतून दोन जणांनी उड्या मारून पिवळ्या रंगाचा स्प्रे फवारला. त्यांनी खाली सभागृहात उड्या देखील मारल्या होत्या. या प्रकरणामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान असाच काहीसा प्रकार आज नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात घडला.
ज्येष्ठ पत्रकार व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी आज पत्रकार गॅलरीत येऊन विदर्भाच्या मुद्यावर आमदारांना उद्देशून घोषणाबाजी केली. त्यामुळे सर्व सभागृहाचे लक्ष त्यांच्याकडे होते.
नेमकं काय घडलं?
प्रकाश पोहरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. विधानसभेचे कामकाज सुरू असताना पत्रकार गॅलरीत येऊन प्रकाश पोहरे यांनी तालिका अध्यक्षांकडे बघून हातवारे केले आणि विदर्भाबद्दल का बोलत नाही अशी विचारणा केली. या मुद्याकडे लक्ष वेधून आमदार व भाजपचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांनी ही कसली सुरक्षा ? असा सवाल केला.गुरुवारी संसदेत घडलेल्या घटनेनंतर विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत कोणीतरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो? कोण आहे ही व्यक्ती? त्यांना प्रवेश कसा मिळाला? विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली? असे प्रश्न उपस्थित करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी मागणी मान्य करीत चौकशीचे आदेश दिले.
पोहरे एवढ्यावरच थांबले नाहीतर खाली उतरून मीडिया पोडियम समोर येऊन स्वत:च बाईट दिला. अधिवेशनात विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळ सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली. शेवटी सुरक्षारक्षकांनी पोहरे यांना तेथून हटवून ताब्यात घेतले.
Users Today : 8