नाशिक : महापालिकेने नोंदविलेले सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण कमी करून जलसंपदा विभागाने पाच हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर केल्याने आता महापालिकेसमोर पाणीकपातीचा पेच निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या पाणी आरक्षण मागणीत ७८६ दशलक्ष घनफुटांनी कपात झाल्यामुळे महापालिकेचे नियोजनच कोलमडले आहे. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे. त्यामुळे जलसंपदाने आरक्षित केलेले पाणी आणि शिल्लक दिवसांचा विचार केल्यास जवळपास ४३६ दशलक्ष घनफूट पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे ही २१ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी दररोज १० ते १५ टक्के पाणीकपात लागू करायची, की आठवड्यातून एक दिवस पुरवठा बंद ठेवायचा, असा पेच पालिकेसमोर निर्माण झाला आहे. नाशिक व नगरच्या धरणांतून मराठवाड्याकरिता जायकवाडी धरणाच्या दिशेने ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने आधीच दुष्काळी परिस्थिती असताना नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचा पहिला फटका नाशिक महापालिकेला बसला आहे. १५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी गंगापूर धरणसमूहातून ४,४००, दारणा धरणातून १००, तर मुकणे धरणातून १,६०० अशी एकूण ६,१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे नोंदविली होती. परंतु, जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने या पाणी आरक्षणावर आता संक्रांत आली आहे.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी गंगापूर धरणसमूहातून ३,८०७, दारणा धरणातून १००, तर मुकणे धरणातून १,४०७ असा एकूण ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी नाशिक शहराच्या पाणीआरक्षण मागणीत तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट पाण्याची कपात झाली आहे. त्यामुळे महापालिकेने गत पाणी आरक्षण वर्षात शहरासाठी ५,७५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाल्याने किमान तेवढे पाणी आरक्षण नाशिककरांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ती मागणीही फेटाळल्याने आता ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणीच शहराला मिळणार आहे. त्यामुळे जुलै २०२४ अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ४३६ दशलक्ष घनफूट पाण्याची तूट निर्माण झाली आहे.‘शटडाऊन’आडून अघोषित कपात?
पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचे नियोजन करीत आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. शनिवारी शासकीय कार्यालये, तसेच औद्योगिक कामगारांना सुटी असते. त्यामुळे दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांना त्याचा कमी त्रास होईल, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, या कपातीला विरोध झाल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. त्यामुळे एकतर दररोज १० ते १५ टक्के कपात करायची किंवा दर शनिवारी ‘शटडाऊन’ करून छुपी कपात करण्याचा विचार आता पालिकेकडून केला जात आहे.
…अशी आहे स्थिती
-गतवर्षाचा पाणीवापर- ५७५० दलघफू
-दररोजचा पाणीवापर- १९.७५ दलघफू
-एकूण पाणी आरक्षणाचे दिवस-२९०
-एकूण आरक्षणाचे दिवस शिल्लक- २३०
-एकूण पाणी आरक्षण कपात- ७८६ दलघफू
-४३६ दशलक्ष घनफूट पाण्याची तूट
-एकूण पाणी तुटीचे दिवस- २१