बुलढाणा : लोणार सरोवर विकासाचे आढावा दौऱ्याबाबत आयुक्तांचे निरीक्षण

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन-संवर्धनासह पर्यटनविकासाला गती देण्यासाठी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंगल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
या दौऱ्यात त्यांनी लोणार विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेऊन गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन सुनिश्चित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह सरोवर परिसराची पाहणी केली आणि विकास आराखड्याविषयी बैठक घेऊन सर्वंकष आढावा घेतला.
आयुक्तांनी बांधकामे, पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. पर्यटनासाठी महत्त्वाचा ठरणारा हा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल यासाठी वन विभाग, नगर परिषद आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी ऐतिहासिक झोपलेले मारुती मंदिराचे दर्शन घेतले आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी काही प्रलंबित मुद्दे मांडले. यात गायमुख धार धार्मिक स्नानासाठी खुली करण्याची मागणी, सरोवरातील गोड्या पाण्याचे नियंत्रित उपसा, प्राचीन मंदिरांसाठी स्वतंत्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि शहर सौंदर्यीकरणासाठी निधी यांचा समावेश होता. आयुक्तांनी तांत्रिक बाबी तपासून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दौऱ्यात विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्षा, पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी व नगरपरिषदेचे अभियंते उपस्थित होते.
सरोवराचा अद्वितीय नैसर्गिक वारसा जपत पर्यटनविकासामुळे स्थानिकांना रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *