उशिरा का होईना एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याने प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता दूर झाली आहे. शिवाय, एसटीच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासूनच डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. य़ा माध्यमातून एसटीच्या ठाणे विभागाला गेल्या दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. आजघडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत असून एखादी छोटी वस्तू खरेदी केली तरी नागरिक ऑनलानद्वारे पैसे देतात. डिजिटलमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली. अनेकदा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र डिजिटल पेमेंटमुळे वाद होणार नाहीत. तसेच, सुट्ट्या पैशांची चिंताही प्रवाशांना राहणार नसून डिजिटल प्रणालीद्वारे प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल, यासाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स एसटीच्या सेवेत आल्या आहेत. या मशिनमुळे प्रवासी रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोडचा वापर करून तिकीट काढत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासूनच एसटीमध्य़े डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून १८ नोव्हेंबरपर्यंत दीड महिन्यात एसटीच्या ठाणे विभागाला डिजिटल प्रणालीद्वारे झालेल्या तिकीटविक्रीतून नऊ लाख सहा हजार ६८५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एसटीच्या ठाणे विभागातील आठ आगारांपैकी सर्वाधिक जास्त ६ लाख ३५ हजार ९५० रुपये इतके उत्पन्न ठाणे १ आगाराला मिळाले आहे. ठाणे २ आगाराला २ लाख ७ हजार ६४५ रुपये, भिवंडी आगाराला १० हजार ४०, शहापूर आगाराला १ हजार ७८५, कल्याण आगार ८ हजार ८८०, मुरबाड १४ हजार ७७०, विठ्ठलवाडी १७ हजार ९५० आणि वाडा आगाराला ९ हजार ६६५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. ठाणे विभागात १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून ८० हजार ८१५ रुपये, ११ ते २० नोव्हेंबरदरम्यान ५८ हजार ५०५ रुपये, २१ ते ३० नोव्हेंबरदरम्यान १० हजार ८० रुपये, १ ते १० डिसेंबर दरम्यान १ लाख ६९ हजार ७६५ रुपये आणि ११ ते १८ डिसेंबरदरम्यान पाच लाख ८७ हजार ५२० रुपयांचे उत्पन्न एसटीला प्राप्त झाले आहे. हळूहळू डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.