ठाणे : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या भव्यदिव्य सोहळ्याच्या निमित्ताने येत्या शनिवारी, ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे शहरात दाखल होणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाकडून जय्यत तयारीही केली जात आहे. या कार्यक्रमाला ४० हजार नागरिकांची उपस्थिती राहणार असून, तब्बल १२०० वाहनांचे पार्किंग, हेलिपॅड व सभास्थळाच्या आढाव्यासाठी प्रशासनाच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी ठाणे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सभास्थळाची सोमवारी पाहणी केली. त्यामुळे या दौऱ्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहेठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ कार्यक्रमला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीसाठी सोमवारी ठाणे महापालिका मुख्यालय येथे बैठक झाली. तब्बल ४० हजार नागरिकांची या कार्यक्रमाला गर्दी होण्याची शक्यता असून, ठाणे तसेच आसपासच्या परिसरातूनही सुमारे १२०० गाड्यांची ये-जा घोडबंदर परिसरात या सोहळ्याच्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे या भागात रस्ते वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता आहे.या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, अपर जिल्हाधिकारी मनिषा निवासी जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, एमएमआरडीए, महामेट्रो व विविध महत्त्वाच्या विभागांचेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पर्यायी व्यवस्था उपलब्ध करा
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीजपुरवठा, इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या. तसेच, या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
वाहतुक उपायुक्तांचे सादरीकरण
मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीजपुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बसगाडांची पार्किंग व्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे प्रवासमार्ग आदींचा या बैठकीत पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सादरीकरण केले.
पार्किंगच्या जागेचे सपाटीकरण
सुमारे १२०० बसगाड्यांच्या पार्किंगचे नियोजन महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या असून, त्यांचे सपाटीकरण आदी कामे करण्यात येत असल्याची माहिती नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी दिली. तर, मुख्य सभामंडप आणि हेलिपॅड यांच्या व्यवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी माहिती दिली. या बैठकीनंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाची एकत्रित पाहणी केली,