व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ६२०००००० रुपये किमतीची दुर्मिळ गोष्ट; ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

Khozmaster
2 Min Read

ठाणे : ठाणे पोलिसांनी व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६.२० कोटी किमतीची ५.६ किलो एम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जब्त केली आहे. ठाणे क्राईम ब्राँचच्या कल्याण यूनिटला काही लोक पाइपलाइन रोडवरुन बदलापूरपर्यंत एका कारमधून एम्बरग्रीसची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं.

पोलिसांकडून कसून तपास सुरू

शनिवारी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, व्हेल माशाची उलटी अर्थात एम्बरग्रीस आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली जाणार असल्याचा संशय पोलिसांना आहे.व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करुन त्यातून मोठे पैसे कमावले जातात. याआधीही अनेकदा याची तस्करी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. इतक्या कोटींच्या या दुर्मिळ गोष्टीची तस्करी केली जाणं, हे वन्यप्राण्यांशी संबंधित गुन्ह्यांची व्याप्ती किती मोठी आहे, याचा पुरावा असल्याची घटना आहे. या रॅकेटमध्ये, तस्करीमध्ये आणखी कोणाचा हात आहे, या तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर याचं कनेक्शन काय आहे? याचा शोध घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जात तपास करत आहेत.

व्हेल माशाच्या उलटीचा कशासाठी होतो वापर?

एम्बरग्रीस अर्थात व्हेल माशाची उलटी एक असा दुर्मिळ पदार्थ आहे, ज्याचा उपयोग परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये व्हेल माशाच्या उलटीची मोठी मागणी आहे. याचा उपयोग परफ्यूम अधिक काळापर्यंत सुरक्षित आणि सुगंधित ठेवण्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात एम्बरग्रीसची कोट्यवधींमध्ये किंमत असून याची परफ्यूम कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे.त्याशिवाय एम्बरग्रीसचा उपयोग औषधं बनवण्यासाठीही केला जातो. त्याशिवाय महागड्या दारू आणि सिगरेट बनवण्यासाठीही या व्हेल माशाच्या उलटीचा वापर केला जातो. व्हेल माशाची उलटी-एम्बरग्रीस अतिशय दुर्मिळ असल्याने त्याची किमतही अधिक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *