मैत्रिणीला मॅनेजरच्या बाईकवर डबलसीट पाहिलं, तरुण पिसाटला, पलावा चौकात गाठून हल्ला, निळजे पुलावर थरार

Khozmaster
3 Min Read

 डोंबिवली : मैत्रिणीला आपल्याच कंपनीतील मॅनेजरच्या बाईकवर डबलसीट पाहिल्याने खवळलेल्या दिव्यातील तरुणाने दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा चौकातील निळजे उड्डाणपुलावर घडली होती.

हल्लेखोराला त्याची महाविद्यालयीन मैत्रीण मॅनेजरच्या दुचाकीवर बसलेली दिसल्याने राग अनावर झाला. दिवा येथील तरुण गेल्या चार वर्षांपासून आपल्या पूर्वाश्रमीच्या महाविद्यालयीन मैत्रिणीने बोलावे म्हणून तिचा पाठलाग करत होता. शिवाय तिला विविध प्रकारे त्रास देत असल्याच्या तक्रारीही मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.आकाश कमलेश तिवारी (२१) असे जखमी झालेल्या कंपनी मॅनेजरचे नाव आहे. आकाश हा डोंबिवली जवळच्या नांदिवली-भोपर रोडला असलेल्या देसलेपाडा भागात राहतो. तर विशाल राजेंद्र तिवारी (२५) असे हल्लेखोराचे नाव असून तो दिवा येथील बंदर भागात राहतो.

काय आहे प्रकरण?

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आकाश आणि संबंधित तरुणी दुचाकीवरुन कंपनीकडे जाण्यासाठी कल्याण-शिळ महामार्गावरून डोंबिवलीच्या दिशेने येत होते. इतक्यात या दोघांच्या पाळतीवर असलेल्या आरोपी विशाल याने पलावा चौकात तक्रारदार आकाश तिवारी याला त्याची दुचाकी थांबवण्याचा इशारा केला. त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेल्या मैत्रिणीने तिथे न थांबण्याची सूचना केल्याने आकाश सुसाट वेगाने डोंबिवलीच्या दिशेने निघाला.

वाहतूक कोंडीत अडकला अन् घात झाला…

कल्याण-शिळ महामार्गावर वाहतूक कोंडी जणू पाचवीला पुजली आहे. या कोंडीत सापडलेल्या आकाशचा घात झाला. पलावा चौकाजवळील निळजे उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने आकाश मैत्रिणीसह कोंडीत अडकला. हीच संधी साधून आरोपी विशाल आकाशचा पाठलाग करत पुलापर्यंत पोहोचला.वाहतूक कोंडीत अडकलेल्या आकाशवर विशाल याने दगडफेक करून त्याला गंभीर जखमी केले. आकाश रस्त्यात रक्तबंबाळ झाला. या घटनेनंतर विशाल याने तेथून पळ काढला. मैत्रिणीच्या मदतीने आकाश पलावा येथील एका खासगी रूग्णालयात गेला. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. विशालने दगडाने हल्ला करून आपणास गंभीर जखमी केल्याची तक्रार आकाश तिवारी याने पोलिसांना दिलेल्या जबानीतून केली.

मोबाईल फोडणाऱ्या माथेफिरूला घराबाहेर हुसकावले

विशाल तिवारी आणि त्याची महाविद्यालयीन मैत्रीण यांच्यात वाद आहे. तीन वर्षांपूर्वी विशाल आणि त्याची मैत्रिण हे दोघे एकत्र होते. मात्र विशाल बरोबर न पटल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. तेव्हापासून विशालला तिच्याबद्दल राग आहे.दरम्यानच्या काळात विशालने मैत्रिणीचा वेळोवेळी रस्त्यात पाठलाग करून तिने आपल्याशी बोलावे म्हणून प्रयत्न केले. आपल्याशी बोलत नाही म्हणून संतापाच्या भरात त्याने या मैत्रिणीचा मोबाईल हिसकावून रस्त्यावर आपटून फोडला होता. शिवाय मैत्रिणीच्या घरी जबरदस्तीने जाऊन तिचा विनयभंग केला.हा प्रकार मैत्रिणीच्या पालकांना समजल्यावर त्यांनी विशालला घराबाहेर हुसकावून लावले होते. आपली मैत्रीण आकाशच्या दुचाकीवरून फिरत आल्याचे कळाल्यानंतर मात्र विशालचा पारा चढला होता. या रागातून त्याने आकाशवर दगडांनी हल्ला चढवला. विशाल वारंवार त्याच्या पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीला त्रास देत असतो. त्यामुळे त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मैत्रिणीच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *