तीन दिवसांपूर्वी झालेल्या व्यावसायिक सतीश पाटील (४८) यांच्या हत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या हत्या प्रकरणामध्ये तक्रारदार भूषण पाटील हाच आरोपी असून पोलिसांनी ३६ तासांमध्ये गुन्ह्याची उकल करत भूषण याच्यासह त्याचा चुलत भाऊ नितीन पाटील याला अटक केली. नियोजनबद्ध कट रचत सतीश यांची हत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले मूळचे धुळ्याचे असलेले सतीश पाटील गेल्या एक वर्षापासून ठाण्यातील वर्तकनगर, देवदयानगर येथे राहात होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. शनिवारी सायंकाळी घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरात सतीश यांची गाडीमध्येच तीक्ष्ण शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. गाडीमध्ये बसलेले असताना दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कर सल्लागार असलेला भूषण पाटील याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्यासाठी पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली. घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींचा शोध घेणे अवघड होते. पोलिसांनी अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रिकरणाची पडताळणी केली. परंतु, तपासात सतीश यांचे भूषण याच्यासोबत आर्थिक व्यवहार असल्याची बाब समोर आली. सतीश यांनी भूषणला पैसेही दिले होते. हा आकडा दीड ते दोन कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. याच व्यवहारातून भूषण, त्याचा चुलत भाऊ नितीन पाटील आणि मुलुंड येथील अन्य एक व्यक्ती यांनी अन्य साथीदारांच्या साह्याने कट रचून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. भूषण आणि नितीन यांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सतीश यांची हत्या झाली तेव्हा गाडीमध्ये भूषण आणि नितीन होते, असेही पोलिसांनी सांगितले.
Users Today : 28