छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.सोयगाव तालुक्यात व संभाजीनगर जिल्ह्यात नागरिक विविध कामानिमित्त शासकीय कार्यालयात येतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी तसेच त्यांची भेट घेण्यासाठी संबंधितांची ओळख पटणे आवश्यक असते. परंतु, अनेक अधिकारी, कर्मचारी हे ओळखपत्र गळ्यात घालत नाहीत. त्यामुळे अशांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी दिला आहे. पंचायत समिती स्तरावर शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थ येतात. परंतु, शासकीय कार्यालयात कार्यरत अनेक अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र लावत नसल्याने कोणत्या योजना कोणत्या शाखेमार्फत राबविल्या जातात हे त्यांना कळत नाही. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले हे शेतकरी, ग्रामस्थ हताश होऊन इतरत्र विचारणा करतात. मात्र, कर्मचारी, अधिकारी देखील त्यांना व्यवस्थित उत्तरे देत नाहीत किंवा आपले ओळखपत्र दाखवत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने तुपे यांनी पत्र जारी केले आहे.अशी माहिती सरपंच राहुल हेलोडे डाभा ता सोयगाव यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 1