कोविड जेएन-वन या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी अकोला : कोविड जेएन-वन या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध ठेवावे. नागरिकांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले .कोविड – 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे भेट देऊन कोविड वॉर्ड, ऑक्सिजन प्लँट, चाचणी प्रयोगशाळा यांची पाहणी केली व आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये व अनेक आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन-वन या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. कुंभार म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता जेएन-वन या नवीन व्हेरियंटबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांनी कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शासकीय रुग्णालयात कोविड तपासणी सुविधेसाठी मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा साठा उपलब्ध ठेवावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य औषधोपचार उपलब्ध करून द्यावा. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे व लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करून घेणे या बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री. कुंभार यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *