बुलढाणा, दि. २९ (प्रतिनिधी) प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे प्रतिपादन : प्रबुद्ध भारत वाचक मेळाव्याला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद …………………………
आपण गप्प बसलो, अन्यायाविरुद्ध आवाज उठविला नाही तर जुलमी, अत्याचारी लोक आपले अस्तित्व संपुष्टात आणतील. अन्यायाला वाचा फोडत ठामपणे बोला. समूहाबद्दल, राजकीय आकांक्षाबद्दल, विकासाच्या संधींबद्दल आपणच बोलले पाहिजे. त्यासाठी माध्यमे लागतात. वर्तमानपत्रे, माध्यमं नसली तर तुम्ही कितीही वैचारिक आणि प्रामाणिक असा, तुमचे चारित्र्यहनन करण्यासाठी, तुमचा आवाज दाबण्याकरिता प्रस्थापित मीडिया कायम पुढेच राहणार आहे. म्हणूनच आपली माध्यमं गरजेची आहेत, असे प्रतिपादन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी रविवारी येथे केले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या वतीने शहरातील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये २८ जानेवारी रोजी प्रबुद्ध भारतचा वाचक मेळावा पार पडला. मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर बोलत होत्या. याप्रसंगी भारिपचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचितचे राज्य प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव तायडे, महिला प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे, जितरत्न पटाईत, जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी विजयनगर येथून मान्यवरांच्या स्वागतासाठी मेळावास्थळापर्यंत जोरदार घोषणा देत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
सध्याच्या व्यवस्थेवर कडाडून आसूड ओढत अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या, सध्याचे निर्माण झालेले धोकादायक चित्र आपण सर्व बहुजनांना बदलायचे आहे. त्यासाठी एकजुटीने काम करा. आपण खूप वेळा नियोजन करतो. मात्र, पाठपुरावा करत नाही. आंबेडकरी चळवळीतील सगळ्या संघटनांची ही मोठी शोकांतिका आहे. आपले इरादे भक्कम असतात, आपण अनेक गोष्टी बोलतो. प्रत्यक्षात टार्गेट पूर्ण करण्याची वेळ आली की आपण पाठपुरावा करण्यात कमी पडतो, त्याविषयी चिंतन करा. आपल्यापेक्षा भाजपच कितीतरी पुढे आहे, असे सांगणारा कार्यकर्ता मला सच्चा व प्रामाणिक वाटतो. हीच माझी भावना सतीश पवार व त्यांच्या टीमबाबत आहे. नेतृत्वालासुद्धा तुम्ही कुठे तरी तुमच्या कामामध्ये कमी पडताय, तुम्ही असं केलं पाहिजे, हे ठणकावून सांगणारा कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये असतो, त्या पक्षाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. सोनोने, मुंढे, पुंडकर, पटाईत, भीमराव तायडे, बाला राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक ॲड. संतोष कदम यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पारवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कडूबा पैठणे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी अर्जून खरात, बाला राऊत, राहुल वानखेडे, संतोष कदम, उत्तम पैठणे, गौतम गवई, राहुल दाभाडे, अनिल पारवे, किरण पवार, समाधान पवार, सतीश गुरचवळे, सूर्यनंदन जाधव, राहुल बनसोडे, प्रवीण गरुडे, विशाल साळवे, राजू वाकोडे, वसंता वानखेडे यांच्यासह युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
युवकांची ताकदच ‘वंचित’चे पुढच्या ५० वर्षांचे भवितव्य ठरवणार
युवकांची मोठी ताकद उभी राहिली तर आपण वंचित बहुजन आघाडीचे पुढील ५० वर्षांचे भवितव्य निश्चित करू, असा विश्वास व्यक्त करत प्रा. अंजलीताई म्हणाल्या, चार, पाच लोकसभा निवडणुकांचा अनुभव मी साहेबांसोबत घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या तक्रारी येतात, त्यात ९० टक्के तक्रारी आपल्याला डावलल्याविषयीच्या असतात. आपण कोणाशी लढतो, आपल्यासमोरील आव्हाने काय, याचे भान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे. आपल्यात काय शिस्त हवी, काय प्रामाणिकपणा पाहिजे, कशाप्रकारे या आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करू, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
पक्षकार्य काय असते, ते सतीश पवारांकडून शिका
युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या, सतीश पवार हे एक धडाडीचे युवा नेते आहेत, ते कार्यकर्ता म्हणूनच काम करतात. वाचक मेळावा घेण्यासाठी ते सतत सहा महिन्यांपासून संपर्कात होते. आज हा मेळावा त्यांनी यशस्वीदेखील केला आहे. प्रबुद्ध भारत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, याची खटपट आयोजक किती करतात, हे त्यांच्या तळमळीतून दिसून येते. एका दिवसाच्या मुंबईतील ट्रेनिंगसाठी ते आले होते. जिल्हाध्यक्ष, महासचिवांनी काय काम करायचे, त्यांची जबाबदारी काय, दिशा कशी असावी, याचे टार्गेट दिले. सोशल मीडिया कशी उभी करावी, पक्ष सभासद कसे करावे, शाखा कशा निर्माण झाल्या पाहिजे, यावर चर्चा केली. पुढील वर्षासाठी आमची उद्दिष्ट्ये काय हे सर्वांनी एकत्र बसून ठरवले. त्याचा आराखडा तयार केला. अवघ्या काही महिन्यांमध्ये सतीश पवार यांनी आपली जबाबदारी पेलत ८० टक्के कामाचे नियोजन पूर्ण केले. राज्यात बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या युवा आघाडीचे काम उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. मी सतीश पवार यांना स्टेजवर बसण्याचा आग्रह करत होते. मात्र, त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, ताई आम्ही ठरविले आहे की, बुलढाणा विधानसभेवर प्रतिनिधी पाठवल्याशिवाय आंबेडकर घराण्यातील सदस्यासोबत स्टेज शेअर करणार नाही. त्यांच्या या जिद्दीचा आदर्श युवकांनी घ्यावा, असे आवाहनदेखील अंजलीताई यांनी केले.
देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धोका : सतीश पवार
देश संविधानिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष आहे. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता प्रजासत्ताक, धर्मसत्ताक होतो की काय? अशी भीती व्यक्त करतानाच देशाच्या धर्मनिरपेक्षतेला होणारा धोका ओळखून आपण सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे, असे आवाहन युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी यावेळी केले. सविताताई मुंढे यांनी दोन आमदार देण्याच्या विधानाचा धागा पकडून ताई तुम्ही दोन मागत होत्या, मी तीन आमदार देतो, असे सांगत सतीश पवार म्हणाले, प्रबुद्ध भारत हा वंचितचा समूह नसून इतर सर्व लोकांचा आहे. बामसेफ, कास्ट्राईबसह विविध संघटना तसेच सामाजिक संघटना आपल्यासोबत आल्या आहेत. भुईमुगाच्या झाडाला जमिनीखाली शेंगा येतात, तसंच माझं नेटवर्क खाली आहे. आज बुलढाण्यात असा वॉर्ड नाही, तालुक्यात असे गाव नाही, तेथे आमची शाखा, आमचा सभासद नाही.
लोकसभेसाठी पाच लाख देण्याची पवारांची घोषणा
प्रबुद्ध भारतचे आता तीनशे सभासद केले आहेत, लोकसभा निवडणुकीपूर्वी एक हजार सभासद करून यादी तुमच्यासमोर सादर करतो, असे अभिवचनही पवार यांनी यावेळी दिले. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वंचितला लोकवर्गणीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा करतानाच कर्मचारीवृंदांनी गोळा केलेले यातील ५० हजार रुपये अंजलीताई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत वाचक सभासदांनी आपल्या परीने एक लाख रुपयांचे अर्थसाह्य यावेळी केले.