शॉर्टसर्किट झाल्याने किराणा दुकान जाळून खाक : सुमारे २६ लाखांचे नुकसान : शिरूरच्या टाकळी हाजीतील घटना

Khozmaster
3 Min Read
 कवठे येमाई दि. ०३ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून दुकानातील जवळपास सर्वच साहित्य जाळून खाक झाले आहे.या दुर्दैवी घटनेत सुमारे सव्वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेबाबत दुकानाचे मालक दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांनी टाकळी हाजी पोलिसांत रीतसर माहिती दिली आहे. कांदळकर यांच्या दुकानात गुरुवारी पहाटेचे सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली अशी माहिती मिळाली.
टाकळी हाजी गावातील मळगंगा मंदिरात पालखी जवळ असलेले भक्त जयसिंग शिंदे यांना धुर दिसून आल्याने त्यांनी त्या दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही वीजेचा धक्का बसला. त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देवून मदतीचे आवाहन केले. आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात पेटल्यामुळे शेजारीच झोपलेले कांदळकर कुटुंबास जाग आल्याने ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. परंतु काही करण्याच्या आधीच सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुकानातील सर्व किराणा साहित्य, फ्रीज,दुकानात लावलेली मोटासायकल तसेच किचन व त्यातील सर्व भांडी व साहित्य तसेच त्यांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाल्याचे दुकानदार दत्ता कांदळकर यांनी सांगितले. त्यांचे कुटुंब दुकानाच्या शेजारील खोलीत झोपलेले होते त्यामुळे सुदैवाने या घटनेत जीवित हानी टळली.
घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुअण्णा  घोडे,पोलीस पाटील शोभा मंदिलकर,विनोद बोखारे,मयुर मंदिलकर,संतोष गावडे, दत्ता गावडे,अशोक कांदळकर,विक्रम घोडे,निकीता गावडे,सागर कांदळकर हे तात्काळ घटनास्थळी आले.त्यांनी आग विझविण्यासाठी यावेळी शर्थीचे प्रयत्न केले.
तर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भेट देत तहसीलदारांशी संपर्क करून पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.महावितरणचे टाकळी हाजी शाखा अभियंता राजेंद्र इंगळे,तलाठी ज्ञानेश्वर चौधरी,ग्रामसेवक राजेंद्र खराडे,यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.
पोपटराव गावडे- माजी आमदार,शिरूर 
“सदर जळीताची घटना ही खूप मोठी असून यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. पिडीत कांदळकर कुटुंबाला सरकारी पातळीवर तात्काळ मदत मिळणे अत्यावश्यक आहे.तसेच दुकानाचे मालक दत्तात्रय कांदळकर यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम व अत्यंत गरीबीची असून त्यांना स्थानिक पातळीवर देखील नागरिकांनी शक्य ती अधिकाधिक आर्थिक मदत करावी असे आवाहन करीत आहे.”

टाकळी हाजी येथील मळगंगा मंदिर व परिसरात विजेच्या खांबाची उंची कमी आहे परिणामी विजेच्या तारा कमी उंचीवर लोंबकळत आहेत येणारी वाहने व तारांचा संपर्क होवून दुर्घटना घडू शकते विजेच्या खांबांची उंची वाढवावी .तारांचे जाळे कमी करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

– सुभाष शेटे,९९७५६७४२८६

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *