(मर्मभेदी वैचारीक लेख)
सध्या उन्हाची काहिली जीवाची अगदी लाही लाही करीत आहे.दिवसभर घरात थांबल्यानंतर, सायंकाळी सहज फेरफटका मारावा म्हणून चौकात एक सावलीच्या ठिकाणी जाऊन बसलो व मोबाईल हाताळत बसलो.तेवढयात एक वृध्दापकाळाकडे वाटचाल करीत असलेली म्हातारी आजी माझ्या जवळ येऊन सहजपणे बोलून गेली,”मोबाईल काही सुटना नही अजून”, त्या म्हातारीचे ते वाक्य व शब्द मला भुतकाळात घेऊन गेले.किती आनंदी व समाधानी होते ते दिवस! जेव्हा कधी फक्त चिठ्ठ्यावर व पंधरा पैश्याच्या पोस्टकार्डवर एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जायची.न कोणता राग होता न कोणता रुसवा फुगवा होता.वर्षभरातून कधी तरी भेटणारे सुध्दा आनंदी व समाधानी होते.आज मोबाईल नावाच्या चार अक्षरी खेळण्याने जग जरी जवळ आले असले तरी या इंटरनेट युगात मोबाईलने मात्र कित्येकाचे संसार अक्षरशः उध्वस्त केलेत.मोबाईल चांगला तसा संसाराचा सत्यानाश करणारा असं आता नाईलाजास्तव म्हणावे लागत आहे.आमच्या लहानपणी खेळायला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती.कबड्डी खेळणे, आट्यापाट्या खेळणे,गोटया गोटया खेळणे,झाडावर चढुन टिपाटिपी खेळणे हे सारेच खेळ मोबाईलने खाऊन टाकले आहेत.आजकाल घरात एखादे लहान मुलं जरी रडायला लागले तरी आई बाप मोठ्या कौतुकाने मुलांच्या हाती मोबाईल देतात म्हणजे बालपणाचा खरा आनंद सुध्दा या मोबाईलने लेकरापासून हिरावून घेतला.मोबाईल मुळे अक्षरशः वेडेपिसे झालेले लोकही मी जवळून पाहिले आहेत.तर या मोबाईलने लहान मोठयांसह सगळयांनाच एका मोठ्या व्यसनात अडकवून टाकल्यामुळे भावी पिढी नेमके आपले जीवन कसे सुधारणार हा जरी यक्ष प्रश्न असला, तरी आज घराघरात आपल्या आईबापांच्या दवाखान्याला अथवा गोळ्या औषधांना पैसे नसले तरी चालतील पण मोबाईल मध्ये बँलन्स मात्र पाहिजे अशा अतातायी पध्दतीमुळे आज घराघरात दुरावा निर्माण होत आहे.एकमेकांशी प्रेमाने व मायेने बोलायला देखील कुणाला वेळ राहिलेला नाही.दारू,गांजा भांग पेक्षाही भयंकर व्यसन इंटरनेटच्या जमान्यात मोबाईलने लावले आहे.त्यामुळे आज सारी दुनियाच आँनलाईन झाली आहे.पण शेवटी मोबाईल कसा वापरायचा? हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी एक मात्र खरे की, मोबाईल चांगला तसाच संसाराचा सत्यानाश करणारा असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरु नये.मला त्या म्हातारी आजीने दिलेला मोलाचा उपदेश जीवनाचे खरे मोल कश्यात आहे हे खुप काही शिकवून गेले.
स्वप्निल देशमुख..
Users Today : 22