१८ जून रोजी मतदान तर २२ जूनला मतमोजणी
४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार
– जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, दि. १९ भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर केली असून अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली आहे. निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, या निवडणुकीसाठी दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून दि. १ जूनपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. २ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून दि. ४ जून ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे. दि. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. तर २२ जून रोजी मतमोजणी होऊन २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी यांचे दालन, दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघात नाव असणे बंधनकारक असून त्याची साक्षांकित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट, नगरपरिषदा व नगरपंचायतींचे सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव, कर्जत, अकोले, जामखेड व पारनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा या निवडणुकीत मतदार म्हणून समावेश आहे. एकूण ४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
निवडणुकीसाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार असून मतदारांनी पसंती क्रमानुसार मतदान करावयाचे आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली असून मतदान केंद्रांची व्यवस्था संबंधित तहसील कार्यालयांमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या कक्षात मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तर या निवडणुकीची मतमोजणी जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गासाठी १० हजार रुपये तर अनुसूचित जाती, जमातीसाठी ५ हजार रुपये इतकी अनामत रक्कम असणार आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५ तसेच भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेवर अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रके, झेंडे किंवा घोषणा लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिली.
Users Today : 32