वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा

Khozmaster
2 Min Read

वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा
वरिष्ठांकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप
बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी)
..
वरिष्ठांकडून विश्वासात न घेता डावलल्या जात असून, पक्ष संघटन वाढविण्याच्या कार्याला प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी ५ मे रोजी ‘वंचित’चे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजाची दखलपात्र लोकसंख्या असतानादेखील समाजबांधवांची हतबलता दिसून आली. या परिस्थितीने व्यथीत झाल्यानेदेखील आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पवार यांनी ‘ना’राजीनाम्याचे पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकशाही मार्गाने विविध प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून वर्षभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांसोबतच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले. जनतेला न्याय मिळवून देणे, एवढेच ध्येय समोर ठेऊन काम केले. मात्र, प्रामाणिकपणे केलेल्या कामाची आणि निष्ठेची कुठलीही कदर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून झाली नाही, याची खंत असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे सतीश पवार यांनी म्हटले आहे. याउलट माझ्यावर वरिष्ठांकडून तथ्यहीन आरोप केले जात आहेत.
नियुक्ती झाल्यापासून मी पक्षवाढीसाठी कायम प्रामाणिकपणे काम केले आहे. या संदर्भातील अहवालही वरिष्ठांना दिला. जनतेच्या न्याय्य हक्कासाठी केलेली अनेक आंदोलने यशस्वी झाली. सामाजिक पातळीवर जागतिक धम्म परिषदही यशस्वी केली. न्याय्य मागण्या शासन, प्रशासनाला पूर्ण कराव्या लागल्या एवढी दखलपात्र आंदोलने झाली. मोठ्या ताकदीने लढलो, तरीदेखील पक्षाकडून अविश्वासाचे वातावरण दाखविण्यात येत असल्याचे सतीश पवार यांनी म्हटले आहे.

तिनशे शाखा स्थापन

‘गाव तिथे शाखा’ या अभियानांतर्गत जिल्हाभरात तिनशेवर शाखा स्थापन करून तेथील कार्यकारिणी सक्रिय केली. पक्षाला सत्तेकडे घेऊन जाण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. आंबेडकर कुटुंबीयांप्रति माझी निष्ठा प्रामाणिक असल्याने सातत्याने पूर्ण समर्पित होऊन काम करीत आलो. परंतु वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

स्पष्टच सांगितले, तुम्ही काम करू नका

लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची संधीही आमच्याकडून हिरावून घेण्यात आली. उमेदवाराकडून प्रचार साहित्य व स्टेशनरी मागूनही मिळाले नाही. उमेदवारांनी स्पष्टपणे सांगितले की, युवा आघाडीला कोणत्याही प्रकारची जबाबदारी न देण्यासंदर्भात प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर यांचे स्पष्ट आदेश आहेत. उमेदवारांनी कायम आम्हाला प्रचार करण्यापासून थांबवले, असेही पवार यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *