प्रेयसीसोबत ब्रेकअप, तरुणाला संताप, रागाच्या भरात दुकान पेटवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

Khozmaster
2 Min Read

नागपूर : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने केलेल्या कृत्याने नागपूर हादरलं आहे. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसी काम करत असलेलं दुकान पेटवून दिलं आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत बोहरा मशीद गल्ली परिसरात ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजवरुन सुगावा मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. मात्र, या आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झालं आहे.

तहसील पोलीस ठाण्याच्या बोहरा मशीद गल्ली परिसरात रितेश सुदामा मकीजा रा. वर्धमान नगर यांचं स्टेशनरीचं दुकान आहे. ३० एप्रिल रोजी रात्री रितेश दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या दुकानाजवळ एका व्यक्तीने त्यांना फोन करुन त्यांच्या दुकानातून धूर निघत असल्याचं सांगितलं. त्यानंतर रितेश आपल्या दुकानात पोहोचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रितेश दुकानात पोहोचेपर्यंत दुकानातील सर्व सामान जळून राख झालं होतं.

दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि आग विझवण्यात आली. त्यानंतर तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना एका संशयित तरुणाचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दुकानाच्या शटरमधून ज्वलनशील पदार्थ टाकताना दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आजरी माजरी परिसरात राहणाऱ्या आरोपी प्रकाश रमेश चट्टे याला अटक केली आहे.

प्रकाश चट्टे याचं दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर प्रेम होतं. मात्र काही कारणांमुळे त्याचं त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झालं. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्याने रागाच्या भरात त्याने प्रेयसी काम करत असलेल्या दुकानात आग लावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *