अस्सल विनोदी कथांची खुमखुमीत मेजवानी : लेंग्याची नाडी

Khozmaster
5 Min Read
पुस्तकाचे नाव   – लेंग्याची नाडी
लेखक  – प्रा. साईनाथ पाचारणे
प्रकाशक- सुपर्ण प्रकाशन, पुणे.
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- 26 जानेवारी 2024
पृष्ठे       – 160
वाड्मय प्रकार- कथासंग्रह
मूल्य      – 320 रु.
मुखपृष्ठ-   – माननीय श्री. श्रीकृष्ण ढोरे
समीक्षक – सचिन बेंडभर पाटील.
अस्सल विनोदी कथांची खुमखुमीत मेजवानी : लेंग्याची नाडी
        ज्येष्ठ साहित्यिक प्रा. साईनाथ पाचारणे यांची साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी आहे. त्यांची आजपर्यंत अडीचशे पुस्तके प्रकाशित आहेत. यात बालसाहित्य, कविता संग्रह, कथासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद अशा प्रकारचे त्यांचे विविधांगी लेखन आहे. साहित्य अकादमीकडून महाराष्ट्रातून दोन वेळा गुजरातमध्ये तर हिमाचल प्रदेशातील डलहौजी येथे कथा सत्रासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. अनेक नामवंत साहित्य संस्थानचे यांना अनेक पुरस्कार आहेत. तसेच भोर येथील निर्मलाताई थोपटे डीएड कॉलेजचे ते 25 वर्ष प्राचार्य होते.
          लेखक साईनाथ पाचारणे हे मुळातच ग्रामीण लेखक असल्याने सामान्य लोकांचे प्रश्न, त्यांना उद्भवणाऱ्या समस्या व त्यामागील कारणे हे त्यांना चांगले माहित आहेत. ग्रामीण भागात वावरत असताना त्यांनी तिथल्या परिस्थितीचा सखोल अभ्यास केला आहे. याच गोष्टी कथेच्या स्वरूपात मांडून त्यांनी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलं आहे. अगदी रडतखडत दुःख न मांडता विनोदी शैलीने त्यांनी ती वाट मोकळी करून दिली आहे. हल्ली ग्रामीण लेखक फार तुरळक पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात विनोदी लेखक तर एकदमच दुर्मिळ. गेली 25 वर्ष पाचारणे यांनी आपले जीवन ग्रामीण कथांना वाहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कथा अस्सल मातीतून आलेल्या जाणवतात. त्यात कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही. इतक्या त्या सहज सुंदर साकारलेल्या आहेत. पूर्ण एक दशक त्यांनी सकाळच्या गुदगुल्या पुरवणीत ग्रामीण कथांच्या माध्यमातून गाजवलेले होतं. त्यानंतर त्यांचं नाव घराघरात पोहोचलं. आज ग्रामीण कथांचा विषय निघाला तर त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते ते याचं कारणांमुळे.
      प्रा. साईनाथ पाचारणे हे वाचकांसाठी लेंग्याची नाडी हा आपला ग्रामीण विनोदी कथासंग्रह घेऊन आले आहेत. या कथासंग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. यात एकूण नऊ कथांचा समावेश असून सर्वच कथा वाचनीय आहेत. मुळातच ग्रामीण लेखनात त्यांचा हातखंडा असल्याने त्यांच्या कथेत अस्सल ग्रामीण बाज आणि ढंग आपल्याला पहायला मिळतो. एखाद्या कथानकावर ती कथा फुलवण्याची हातोटी त्यांच्यात असल्याने वाचकाला त्या आपल्या वाटतात. त्यांच्या कथांतून आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते.
           लेंग्याची नाडी या शीर्षक कथेत रामू नावाच्या टेलरला नाथाने लेंगा शिवायला दिल्यावर रामू शिलाईचे जास्त पैसे घेतो. शिवाय नाडीचे पैसे वेगळे मागितल्यावर मात्र नाथाला आश्चर्याचा धक्का बसतो. रामू टेलरला अद्दल शिकवण्यासाठी नाथा सरपंचाकडे जातो. तेव्हा राम टेलरने अनेकांना असा गंडा घातल्याची त्याला समजते. सरपंचांना हाताशी घेऊन सर्वजण रामला अद्दल घडवण्यासाठी मास्टर प्लॅन करतात. लिलाबाईच्या मदतीने सरपंच रामूला चांगलाच धडा शिकवतात. रामू टेलर गयावया करतो, माफी मागू लागतो. तेव्हा गांधीगिरी मार्गाचा सर्वांनी अवलंब करावा, असे म्हणून सरपंच त्याला माफ करतात. हा सर्व प्रकार एका लेंग्याच्या नाडीतून कसा घडतो ते लेखक पाचारणे यांनी विनोदी शैलीतून वाचकांपुढे मांडले आहे.
               दिल्लीचं गाजर या कथेत संपत अण्णांचा संपत चाललेला राजकीय प्रवास अचानक दिल्ली वारीमुळे कसा पुन्हा सुरू होतो हे लेखकाने आपल्या विनोदी शैलीत सुंदररित्या मांडली आहे.
         अनेक वर्ष आमदार असलेल्या अण्णांनी मंत्रिमंडळात खातेही मिळवले होते. अण्णा आता मुख्यमंत्री व्हायचेच राहिले होते पण पतंगरावांनी नेमका डाव साधला. त्यांचे स्वप्न धुळीला मिळाले. मग कुणीतरी त्यांना दिल्लीचे गाजर दाखवून खासदारकी लढवण्याचा सल्ला दिला. मग त्यांनी खासदारकी लढवली खरी पण त्यात त्यांचा पराभव झाला. मग मात्र त्यांच्या आयुष्याला उतरती कळायला लागली. कुणीही त्यांच्याकडे फिरकेना त्यांचा वाडा सुना सुना दिसू लागला. त्यांचं ते दुःख पाहून त्यांची पत्नी वत्सलाबाईंनी त्यांना दिल्ली वारीचा सल्ला दिला. आणि मग अण्णांचे आयुष्यच बदलले. त्यांना प्रकाश झोतात आणण्यात पत्रकार जयवंतराव काळे यांची मोलाची मदत झाली. अण्णा दिल्लीतून माघारी आल्यानंतर त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. मग हा चमत्कार कसा झाला त्यासाठी तुम्हाला ही कथा वाचावीच लागेल.
               पुणे येथील माननीय श्री. योगेश वाघ यांच्या नावाजलेल्या सुपर्ण प्रकाशन यांनी या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो.  प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री. श्रीकृष्ण ढोरे, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. प्रा. साईनाथ पाचारणे यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा..!
सचिन बेंडभर पाटील
 कार्यकारणी सदस्य,
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे.
0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *