Deulgaon Mahi :
तालुक्यातील देऊळगाव मही येथे मध्यरात्री बारसमोर झालेल्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी एकूण चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी कैलास प्रल्हाद देढे (वय ३४, रा. देऊळगाव मही) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून गोविंद देढे, कार्तिक लिंबाजी देढे आणि संदीप देढे (रा. सर्व देऊळगाव मही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी पहाटे सुमारे १ वाजताच्या सुमारास देऊळगाव मही येथील ‘निवांत बार’ परिसरात ही घटना घडली. आरोपींनी कैलास देढे यांना अडवून जमिनीवर पाडले व लाथाबुक्क्यांसह लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या तोंडी अहवालासह वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी Bharatiya Nyaya Sanhita अंतर्गत कलम ११८ (१), ११५ (२) व ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने दिलेल्या तक्रारीनुसार कैलास देढे यांनी शेतीच्या वादातून कार्तिक लिंबाजी देढे यांना चाकू उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गोविंद शंकर देढे यांच्याशी जुन्या वादावरून पुन्हा भांडण केले आणि सुनीता लिंबाजी देढे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करून घराच्या दरवाज्याचे काचे फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी कैलास प्रल्हाद देढे यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत.
Users Today : 33