ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो…आवाज कुणाचा…नरेश म्हस्के जिंदाबाद, अशा घोषणा देत शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के बुधवारी थेट ठाण्यातील चंदनवाडी येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेत शिरले. याठिकाणी उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही समजण्याच्या आतच म्हस्के यांनी शाखेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. एकीकडे ठाणे शहरात शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर शाखांवरुन झालेला वाद चांगलाच रंगला होता. मात्र महायुतीच्या प्रचार फेरीदरम्यान म्हस्के यांच्या या शाखा एन्ट्रीने राजकीय नाट्य रंगले.
ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली शहरात सुरु होती. ही रॅली पाचपाखाडी येथील रायगड गल्ली भागात आली. याच परिसरात शिवसेना ठाकरे गटाची चंदनवाडी शाखा आहे. दोन वर्षांपूर्वी शाखांच्या वादाची ठिणगी याठिकाणीही पडली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी या शाखेवर ताबा कायम ठेवत पक्षाचे काम येथून सुरु ठेवले.
पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या शाखेत अचानक नरेश म्हस्के आणि महायुतीचे पदाधिकारी आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शाखेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या तसबिरीसमोर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन म्हस्के निघाले. मात्र महाराजांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने का होईना, म्हस्के यांनी ठाकरे गटाच्या शाखेत केलेल्या प्रवेशाने उपस्थित शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या.
Users Today : 28