मुख्यमंत्र्यांच्या लेकाचे ‘कल्याण’ करण्यासाठी PM मोदींसह राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ग्राऊंडवर तगडी फिल्डिंग

Khozmaster
2 Min Read

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका लागणार आहे. १२मे ला कळव्यातील खारेगाव येथे राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. तर नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिम येथे १५ तारखेला आणि राज ठाकरेंचे होम ग्राऊंड असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात १७ तारखेला जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. जेथे राज ठाकरेही सभेला संबोधित करणार आहेत. सभांच्या नियोजनांसाठी डोंबिवलीतील शिवसेना, भाजपा , मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांची डोंबिवलीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह महायुतीचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मताने जिंकू, श्रीकांत शिंदेंचा विश्वास
कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी १५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. भिवंडी लोकसभेत त्यांची सभा आयोजित केली आहे. यात महायुतीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्या समन्वयाने प्रचारसभांचं नियोजन चांगला झालं पाहिजे यासाठी नियोजन बैठक घेतली आहे. १५ तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट येथे सभा होणार आहे, अशी माहिती देत महायुतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून कल्याण लोकसभेची जागा महायुती विक्रमी मताने जिंकून आणेन, असा विश्वास शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आमच्यासाठी महत्त्वाची म्हणजे पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कातील सभा, राजू पाटील यांचे वक्तव्य
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, राज साहेबांची सभा कणकवलीमध्ये झाली. महायुतीला उत्स्फूर्त पाठिंबा आहे. आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सभा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणारी सभा. याच्या नियोजनासाठी आम्ही आज बैठक घेतली. राज ठाकरे यांची १७ तारखेची सभा ही शेवटची असेल. राज साहेबांची सभा म्हटलं की, आमच्या ठरलेल्या फॉरमॅटप्रमाणे आढावा घेऊन आमच्या कामाला लागतो. मात्र यावेळेस महायुतीसाठी काम करतोय, मोदींसाठी काम करतोय, यात इतर पक्षांचीही साथ मिळते त्यामुळे सभा जोरात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही १२ तारखेच्या कळवा परिसरातील सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पाहतोय, आमचा फोकस आमच्या सभांवर आहे. बाकीच्या पक्षाच्या कुठे किती सभा आहेत, यामध्ये आम्हाला रस नाही, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या सभा होत असतात. मात्र आमच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे देखील राजू पाटील म्हणाले आहेत.
0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *