नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘डॅमेज कंट्रोल’साठी बुधवारी शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकीचे दर्शन घडविले खरे. मात्र, नाशिकची जागा आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत शिंदेंनी यावेळी हेमंत गोडसेंचेही कान टोचले. आमदार, नगसेवकांच्या कामात हस्तक्षेप करू नका, असे सांगत नाहीतर माझ्याशी गाठ असल्याचा अप्रत्यक्ष दमच शिंदेंनी गोडसेंना भरला. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिकचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन करीत एकीची सादही घातली.मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि सिन्नरचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटेंनी पाठ फिरवली. त्यामुळे महायुतीतील बेबनाव अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीत असमन्वय दिसून येत आहे. महायुतीतील तीनही पक्षांत बेबनाव आहे. त्यामुळे शिंदेंनी बुधवारी तातडीने नाशिकमध्ये धाव घेत मेळावा घेण्यासह महायुतीच्या नेत्यांचीही बैठक घेऊन नाशिकसाठी ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केला. शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात हेमंत गोडसेंना निवडून आणण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Users Today : 8