जेल किंवा पक्ष बदलणं दोनच पर्याय होते; रवींद्र वायकर यांच्या धक्कादायक गौप्यस्फोटाने महायुतीच्या अडचणीत वाढ

Khozmaster
2 Min Read

राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते. त्यात माझ्या पत्नीचं नावही या प्रकरणात नाव गोवलं गेलं होतं. त्यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्यायच नव्हता, असा गौप्यस्फोट रवींद्र वायकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच रवींद्र वायकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा करून महायुतीची झोप उडवली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. चुकीच्या प्रकरणात मला गोवलं गेलं. त्यामुळे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याजवळ होते. त्यामुळे मी जड अंत:करणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव होता. या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवल्याने मी व्यथित झालो होतो. नियतीने अशी वेळ कुणावरही आणू नये, असं रवींद्र वायकर म्हणाले.

कुटुंबाला पारखा झालो

यावेळी रवींद्र वायकर हे भावूक झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा कंठ दाटून आला होता. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून माझ्या खांद्यावर शिवधनुष्य आहे. 50 वर्ष एक शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर मला ठाकरे घराण्याची साथ सोडावी लागली. एखादी व्यक्ती जशी कुटुंबाला पारखी होते, तशीच काहीशी माझी अवस्था झाली होती. हा नियतीचा खेळ आहे, असं वायकर म्हणाले.

माझं प्रकरण राजकीय

यावेळी वायकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. सर्वोच्च न्यायालयानेच मला क्लिनचीट दिली आहे. पण माझे प्रकरण राजकीय असल्याने माझ्यावर दबाव आला. मला तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं याशिवाय पर्याय नव्हते. त्यामुळे मला दुसरा पर्याय निवडावा लागला, असंही ते म्हणाले.

दोन शिवसैनिक आमनेसामने

रवींद्र वायकर ज्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्या मतदारसंघातील परिस्थिती काहीशी विचित्र आहे. या मतदारसंघात दोन शिवसैनिक आमनेसामने आहेत. रवींद्र वायकर हे ठाकरे गटातून शिंदे गटात आले. ते या मतदारसंघातून लढत आहेत. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर लढत आहेत. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातील खासदार होते. ते आता शिंदे गटात आहेत. म्हणजे गजानन कीर्तिकर हे मुलाच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचं चित्र दिसत आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *