उरुळी कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याच्या लोखंडी कठडा तोडून कार गाडी पाण्यात पडली आहे. या अपघातात एकाच्या जागेवर मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.
हा अपघात गुरुवारी (दि.२३) सकाळी सहाच्या सुमारास घडला आहे.
अमर साहेबराव घाडगे (वय २८ रा.जुन्नर) या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश संजय थोरात (वय २२) व शुभम शंकर इंगोले (वय २१) रा.दोघेही केसनंद ता. हवेली व आदित्य महादेव तावरे (वय २०रा.जुन्नर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी की, कारमध्ये असलेल्या चौघांचा बकऱ्या विकण्याचा व्यवसाय आहे. आज सकाळी फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण कार गाडीतून निघाले होते. शिंदवणे गावाच्या हद्दीत असलेल्या कालव्यावर आले असता कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात पाण्यात कोसळली. यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चारचाकी कोसळल्याची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मदत करून सर्वांना गाडीतून बाहेर काढले.
Users Today : 37