काँक्रिटीकरणाची रखडपट्टी, खड्डे मोडणार मुंबईकरांचे कंबरडे

Khozmaster
2 Min Read

 मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. काही भागांत कामेही सुरू झाली आहेत, तर काही भागांतील कामांना अजून मुहूर्त मिळालेला नाही.

पावसाळ्यात काँक्रिटीकरणाची कामे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे ही कामे आता पावसाळा संपल्यानंतरच सुरू होणार आहेत. परिणामी यंदाच्या पावसाळ्यातही खड्ड्यांतून प्रवास करावा लागेल, अशीच शक्यता आहे.

खड्डे बुजवण्यासाठी १४ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे यंदाही खड्डे भरण्यासाठी शे-दोनशे कोटी रुपये ‘खड्ड्यांत’ जाणार असे दिसते.

काँक्रिटीकरणाची पहिल्या टप्प्यातील ३९७ किमीची कामे सध्या सुरू आहेत. सुमारे १४ महिन्यांनंतर यापैकी फक्त २० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी ही कामे वेगाने करीत किमान ५० टक्के कामे यंदाच्या मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. शिवाय पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काँक्रिटीकरणामध्ये रस्त्यांचा सध्याचा पृष्ठभाग खोदून काँक्रिटच्या थरांनी भरला जातो. त्यावर काँक्रिटचे थर टाकून पाण्याचा मारा करून, सुकविण्याच्या प्रक्रियेला ४० ते ४५ दिवस लागतात. त्यामुळे ३० एप्रिलनंतर कोणतेही नवीन रस्ते खोदण्यास परवानगी दिली गेलेली नाही.

प्रशासन शे-दोनशे कोटी घालणार ‘खड्ड्यांत’-

१) जानेवारी २०२३ मध्ये ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ६ हजार कोटींच्या कामांचे आदेश कंत्राटदारांना दिले.

२) विविध कारणांमुळे ही कामे रखडली. दुसऱ्या टप्प्यात आणखी ४०० किमीच्या २०० हून अधिक रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पालिकेने ६ हजार कोटींच्या निविदा मागवल्या. त्याची प्रक्रिया सुरू आहे.

३) ही कामे ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *