अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील टिळक मार्गावर घडली. शेतकऱ्यांची पसंती असलेल्या कपाशी बियाण्यांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला. कृषी सेवा केंद्रांसमोर रांगेत उभे राहून देखील मुबलक बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोषाची भावना आहे
खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग दिसून येते. यंदा शेतकऱ्यांचा कापूस पिकाकडे ओढा आहे. कापसाचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. मागील चार दिवसांपासून शेतकरी पहाटेपासून कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगा लावून खरेदी करीत आहे. मात्र, कृषी केंद्र चालकांकडून आज दुकान उघडण्यात न आल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. शेतकऱ्यांना ज्यादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे अकोल्यात शेतकरी चांगले आक्रमक झाले असून टिळक मार्गावर रास्ता रोको करीत आपला रोष व्यक्त केला.
यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत. केंद्रावर क्रमांक लागल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ दोनच पॅकेट बियाण्याचे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन केले. अनेक गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर चक्का जाम केला. पोलिसांकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला.
बियाण्यांची वाढती टंचाई शेतकऱ्यांपुढील गंभीर प्रश्न बनला आहे. बियाणे मिळवण्यासाठी कृषी केंद्रांपुढे रांगा वाढू लागल्या आहेत. प्रत्येकाला दोन पाकिट मिळावे या हेतूने शेतकऱ्यांच्या घरातील महिलाही कृषी केंद्रांपुढे रांगेत लागत आहेत. यातूनच अकोटमध्ये रांगेत लागलेल्या महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी काही दुकानदारांकडून प्रत्येक पाकिटांमागे ३००-४०० रुपये अधिकचे घेतले जात असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे तत्काळ उपलब्ध करून द्या
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जमावबंदी असतानाही शेतकऱ्यांच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी रांगा वाढल्या आहेत. बियाणेच मिळत नसतील तर शेतकरी पेरणी कशी करणार? अधिक उत्पादन मिळवून देणाऱ्या बियाण्यांसाठी आग्रह धरणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक बियाणे उपलब्ध करून देत अकोल्यातील रांगा संपवा, अशी मागणी शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी अकोल्याचे जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांना पत्र देऊन केली आहे.