मोबाइल चोरांच्या दारी पोलिसांची टकटक! दोघांना अटक, विविध राज्यांमध्ये ६० गुन्हे दाखल

Khozmaster
2 Min Read

मुंबई : मोटारीच्या खिडकीवर टकटक करून चालकाला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने मोबाइल फोन चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना गजाआड करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. फईम शेख (३५) आणि मोहम्मद फईम अलमुद्दीन खान ऊर्फ बिल्ला (३९), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात विविध राज्यांमध्ये ५० ते ६० गुन्हे दाखल असून, त्यांना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तक्रारदाराची मोटार १८ मार्चला वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यावेळी मोटारीच्या अनोळखी व्यक्तीने जोर जोरात थापा मारत ‘तुमने मेरे पैर पे गाडी चला कर मेरा ॲक्सिडेंट कर दिया,’ असे सांगितले. यावेळी दोघांचे बोलणे चालू असताना डाव्या बाजूने त्याच्या दुसऱ्या साथीदाराने काचेवर थाप मारत त्यांचे लक्ष विचलित करून सीटवर ठेवलेला त्यांचा महागडा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी मालाड पोलिसांत तक्रार दाखल झाली होती.

परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, तुषार सुखदेवे, हवालदार संतोष सातवसे, शिपाई स्वप्नील काटे आणि पथकाने १५० सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले. तांत्रिक तपासात उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे आरोपी असल्याचे उघड झाले. त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर पाळत ठेवत मालाड परिसरातून २९ मेरोजी सापळा रचून त्यांचा गाशा गुंडाळण्यात आला.

‘ते’ जंक्शन होते टार्गेट-

१) मुंबईतील ज्या रस्त्यांवर वाहनांचा वेग सिग्नल अथवा वाहतूक कोंडीमुळे कमी होतो, अशा जंक्शनवर आरोपी वाहनचालकांना टार्गेट करत असत. ते रिक्षातून यायचे आणि चोरी करून त्याच रिक्षाने पसार व्हायचे.

२) त्यांच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने ते हे गुन्हे करत असून मुंबई, मुंबई उपनगर, मीरा रोड तसेच दिल्ली, बंगळुरू, मेरठ येथे त्यांनी ५० ते ६० गुन्हे केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये ३० ते ३५ ठिकाणांहून याच कार्यपद्धतीने चोरी केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. त्यांच्याकडून २१ मोबाइल फोन हस्तगत केले आहेत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *