डोंबिवली: लोकलच्या गर्दीने आणखी एकाचा बळी घेतला आहे. एका तरुणाचा दिवा दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. केयूर सावळा (वय ३७) असं या तरुणाचं नाव असून ते डोंबिवली येथील राहणारे होते.
दोन प्रवाशी मित्र काल सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी डोंबिवलीवरून फास्ट लोकलमध्ये नेहमी प्रमाणे गर्दीचा सामना करत मुंबईला खाजगी कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाले. लोकल मध्ये खूप गर्दी असल्याने कसेबसे कसरत करत बबन शिलकर हे लोकलच्या डब्यात आत शिरले आणि तर केयूर सावळा हे बबनच्या पाठीमागेच लोकलच्या दारात अडकले, गर्दीमुळे केयूर यांना लोकलमध्ये प्रवेश करता आला नाही.बबन शिलकर यांनी केयूरला हात दिला. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते, बबनच्या हातातला केयूरचा हात सुटला आणि दिवा स्थानकाजवळ केयूर लोकलमधून खाली पडले. केयूर लोकलमधून पडल्यानंतर बबन शिलकर यांनी दिवा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. केयूर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मागितली. मात्र, सध्या रुग्णवाहिका नाही, असं सांगण्यात आले आणि केयूर यांना बेशुद्ध अवस्थेत जवळच असलेल्या रुग्णालयात तीन चाकी टेम्पो मध्ये नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच केयूर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Users Today : 43