“मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव…”; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन

Khozmaster
2 Min Read

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला, विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले.

मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासीयांची आहे, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केलं आहे.

“क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै… स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.”

“सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडीओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबलं पाहिजे” असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

“मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने नियमानुसार मतमोजणी प्रक्रियेत किंवा मतमोजणी केंद्राच्या जवळपास सुद्धा उपस्थित नसताना मी बंदूक काढली किंवा कोणाला मारहाण केली अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोटारड्या व जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत. अशा गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे” असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

“350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातींना एकत्र घेऊन गावगाडा चालवायची शिकवण दिली, आज त्या शिकवणी पासून परावृत्त न होता, आपला गावगाडा व आपली सामाजिक एकतेची परंपरा अबाधित ठेवणे हे सर्व जिल्हा वासीयांचे आद्य कर्तव्य” असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

0 6 6 1 6 7
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *