मुंबई: डी मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने शर्ट काजू आणि बदामाची पाकिटे शर्टात लपवून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले.
हा प्रकार गोरेगावमध्ये घडला असून याप्रकरणी मोहम्मद साबीर मोहम्मद मोहसीन अन्सारी (३४) नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार सुलतान हुसेन (२४) हे डी मार्टमध्ये फ्लोअर ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ५ जून रोजी ते तळमजल्यावर ड्युटी करत होते. त्यादरम्यान तिथे नेमणूक असलेली सेल्स वुमन अलीमा हिने हुसेनला इशारा करत बोलवले. ती ड्युटी करत असलेल्या ड्रायफ्रूटच्या शेल्फवरील काही पाकिटे समोर उभ्या असलेल्या अनोळखी ग्राहकाने घेतली होती. मात्र आता ती त्याच्या हातात दिसत नाहीत असे सांगितले. तसेच ती पाकीट त्याने शर्टाच्या आत लपवल्याचा संशयही तिने व्यक्त केला.
तेव्हा हुसेन यांनी त्या ग्राहकाचा म्हणजेच अन्सारीचा पाठलाग करत तो डी मार्ट बाहेर जाण्याच्या तयारीत असताना सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्याला थांबवले. तसेच ड्रायफ्रूट्सच्या पाकिटांबाबत विचारणा केली जी त्याने पुन्हा शेल्फवर ठेवली असे सांगितले. त्यामुळे त्याला तपासणी करू देण्याची विनंती करण्यात आली. तपासणी कक्षामध्ये अन्सारीच्या शर्टच्या आत दोन काजू आणि एक बदामाचे पाकीट त्यांना सापडले. ज्याची किंमत जवळपास १ हजार ७०५ रुपये आहे. त्यानुसार अन्सारीला गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.