नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या रोैप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांसोबत उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या जनतेने विश्वासाच्या नात्याने आठ खासदार निवडून दिल्याबद्दल आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना २५ वर्षापूर्वी करण्यात आली.आजवरचा हा प्रवास ‘कभी खुशी कभी गम’ असा आहे. या पक्षासाठी अनेकांचे योगदान आहे, असा उल्लेख केला. काहीजणांनी वेगळे घर केले परंतु त्यातील अनेकांच्या कामाची नोंद आपण घेतली पाहिजे, कारण प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात. त्याची नोंद आपण घेतली पाहिजे,असे सांगितले. राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे, जो आपल्या २५ वर्षापैकी १८ वर्ष स्वतः च्या हिमतीवर सत्तेत राहिला आहे, असा उल्लेख केला. सत्ता देऊन आपल्या सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. त्याचबरोबर प्रत्येक पदाधिकाऱ्याचे, कार्यकर्त्यांचेही आभार मानले.
स्वर्गीय आर आर आबा पाटील, विमलताई मुंदडा, बाबासाहेब कुपेकर, गुरुनाथ कुलकर्णी, वसंतराव डावखरे, वसंत चव्हाण, मनमोहन ओबेराॅय, मोहनसिंग राजपाल, दिग्विजय खानविलकर, अरुण मेहता, गोविंदराव निकम, गोविंदराव आदिक, डि.पी. त्रिपाठी, सुभाषअण्णा कुल, ज्योतीवहिनी कलाणी, वसंत पवार, विनायकराव मेटे, माणिकराव जगताप, ढाकणे साहेब असे अनेक नेते आपण गमावले आहेत. त्यांचे या पक्षासाठी मोठे योगदान आहे, असे नमूद केले.
सोनियाजी गांधी यांची काँग्रेस, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना यांनी आपल्याला फार मोलाची मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. बाळासाहेब थोरात यांचा आवर्जून उल्लेख केला, कारण त्यांचे खुप सहकार्य आपल्याला लाभले आहे. अरविंद केजरीवाल यांनी देखील जेलमधून बाहेर आल्यावर पहिली सभा त्यांनी बाळ्यामामासाठी भिवंडी येथे घेतली होती, याचा आवर्जून उल्लेख करुन त्यांचेही आभार मानले. त्याचबरोबर सर्व मित्र पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचेही आभार मानले.
आता इथून पुढचे तीन साडेतीन महिने आपले एकच लक्ष आहे ते म्हणजे विधानसभा लढणे आणि जिंकणे. आज सर्वांच्या आशीर्वादामुळे आठ खासदार दिल्लीत निवडून गेले, पण जेवढी कष्टाची पराकाष्ठा करुन तुम्ही आम्हाला निवडून दिले. त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करुन विधानसभेवर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सोसायटीपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणूका ताकतीने लढवेल, असे जाहिर केले. मी माझ्या आयुष्यातील सात महिने माझ्या मतदारसंघासाठी दिले होते, कारण माझ्यासमोर लोकसभा निवडणूक जिंकण्याचे ध्येय होते. पवार साहेब संघटनेचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, पण आजपासून विधानसभेची तयारी सुरु करा, असे आवाहन केले. त्याचबरोबर आम्ही आठही खासदार पूर्ण वेळ मदतीसाठी तयार आहोत, असेही सांगितले.
आपल्याला आगामी काळात शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी काही आंदोलने करायची आहेत, असे सांगितले. कांदा, दूध दरवाढीसाठी आंदोलन करायचे आहे, त्याचबरोबर संसदेत राष्ट्रवादी पहिला प्रश्न हा दुध दरवाढीबद्दल विचारेल, असा शब्द दिला. त्याबरोबर आपल्या नवीन खासदारांकडून खुप अपेक्षा असल्याचेही आवर्जून सांगितले. हे सर्व खासदार आगामी काळात संसदरत्न होतील, असा विश्वास व्यक्त केला. पक्ष फुटल्यानंतर सर्व नेते आपल्याला सोडून गेले होते, बारामतीत तर कोणीच नव्हते राहिले. पण फक्त आणी फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकलो असे सांगून सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह आपल्याला लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवायचे आहे. कारण सातारा आणि इतर ठिकाणी थोडी गल्लत झाली होती, त्यामुळे खबरदारी घ्यावी अशी सुचना केली. आगामी काळात संघटना आणि आगामी पाच वर्षाची वाटचाल यावर नक्कीच चर्चा करु असे सांगितले. यावेळी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अनिल देशमुख साहेब, नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे , भास्कर भगरे सर, अमर काळे, बजरंग सोनवणे, शेकापचे जयंतभाई पाटील, फौझियाताई खान, वंदनाताई चव्हाण, जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, ,महेबूब शेख, सक्षणा सलगर यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते
Users Today : 15