नाशिक : राज्याच्या आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्त नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील ६०२ पदांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया काही अपरिहार्य कारणामुळे तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील विविध पदांच्या ६०२ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहायक, लघु टंकलेखक, गृहपाल, अधीक्षक, प्रयोगशाळा सहायक, प्राथमिक शिक्षक सेवक, माध्यमिक शिक्षक सेवक, उच्च माध्यमिक शिक्षक सेवक, इंग्रजी माध्यमिक शिक्षक सेवक आदी पदांसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली, तसेच नियुक्त प्राधिकारी अपर आयुक्त नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेसाठी थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. या जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, शासन निर्देशांनुसार काही अपरिहार्य कारणामुळे सदर पदभरती जाहिरात तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे गुंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.राज्यशासनाने २६ फेब्रुवारी २४ रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश केला आहे. त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट क संवर्गासाठी जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे सदर जाहिरात तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रिय कार्यालयाकडून पुन्हा बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही कळविण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.