नाशिककरांनो सावधान! शहरावर पुन्हा ‘डेंग्यूछाया’; रुग्णसंख्या १२७वर, गोंविदनगरमधील बाधिताचा मृत्यू

Khozmaster
3 Min Read

नाशिक : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नाशिकमध्ये ‘डेंग्यू’चा पुन्हा ज्वर वाढला असून, या वर्षातील डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. गोविंदनगरमधील ५० वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जूनच्या पहिल्याचआठवड्यात शहरात १७ डेंग्यूबाधितांची भर पडल्याने आरोग्य विभाग ‘अॅलर्ट मोड’वर आला आहे.

शहरात जानेवारीपासून आतापर्यंत १२७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, गोविंदनगरमधील संबंधित मृत रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील सेंटिनल लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. डेंग्यूच्या अनुषंगाने गोविंदनगर परिसरातील घरांची ‘डोअर टू डोअर’ तपासणी करण्याचे कामही आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. नाशिकमध्ये ‘स्वाइन फ्लू’पाठोपाठ आता डेंग्यूनेही धडक दिली आहे. विशेष म्हणजे दर वर्षी सप्टेबर, ऑक्टोबरमध्ये होणारा डेंग्यूचा उद्रेक यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच झाल्याने नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात गेल्या वर्षी तब्बल १,१९१ डेंग्यूबाधित आढळून आले होते. त्यापैकी तीन जणांच डिसेंबर २०२३ मध्ये बळी गेला होता. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाने तातडीने उपाययोजना करीत धूरफवारणी, जंतूनाशक फवारणी सुरू केल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. ‘एडिस ईजिप्ती’ या जातीचा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. या प्रजातीच्या डासांची उत्पत्ती पाच ते सात दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. वाढत्या उन्हामुळे यंदा कूलर, एसीचा वापर वाढला आहे. कूलरमध्ये पाणी साचून राहत असल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका कायम असूनही शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात डेंग्यूचे शहरात ३९ रुग्ण आढळून आले होते. आधीच ‘स्वाइन फ्लू’चा प्रकोप वाढला असताना त्यात आता डेंग्यूचीही भर पडल्याने यंत्रणेची चिंता वाढली डेंग्यूबाधितांच्या संख्येत जूनमध्ये त्यात वाढ होतानाच या वर्षातील पहिल्या बळीचीही नोंद झाली आहे. गोविंदनगरमधील एका ५० वर्षी पुरुषाचा तापाने मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्णाची नोंद पालिकेकडे डेंग्यू संशयित अशी होती. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने प्रशासन ‘अॅलर्ट मोड’वर आले आहे. दि. १ जानेवारी ते ८ जून २०२४ या कालावधीतील डेंग्यूबाधित रुग्णसंख्येचा आकडा १२७ वर पोहोचला आहे. त्यामुळे महापालिकेकडून डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वैद्यकीय विभागाअंतर्गत मलेरिया पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे. डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या ९२ नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गोविंदनगरमधील ५० वर्षीय डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून, त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.-डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख, महापालिका
0 7 1 6 7 7
Users Today : 104
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *