नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी तब्बल १५ जणांनी माघार घेतली आहे. यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील या दिग्गज उमेदवारासह काँग्रेसच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात २१ उमेदवार उरले असून या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे, महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.शिक्षक मतदार संघासाठी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतली. यात मंगळवारी चौघांचा तर आज ११ जणांचा माघार घेणाऱ्यात समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या निवडणुकीत आता महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उमेदवार असेल. २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलैला निकाल जाहीर होणार आहे. पाच जिल्हे आणि ५४ तालुके असा शिक्षक मतदारसंघ असून सर्वच उमेदवार आपली ताकद पणाला लावणार आहे.
निवडणुकीतून यांची माघार
गुळवे संदीप नामदेवराव – संगमनेर, शेख मुख्तार अहमद – मालेगाव, दराडे किशोर प्रभाकर – कोपरगाव, रुपेश लक्ष्मण दराडे – येवला, जायभाय कुंडलिक दगडू – पाथर्डी, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे – श्रीगोंदा, रखमाजी निवृत्ती भड – येवला, पंडित सुनील पांडुरंग – नगर, गांगर्डे बाबासाहेब संभाजी – श्रीरामपूर, अविनाश महादू माळी – नंदुरबार, निशांत विश्वासराव रंधे – शिरपूर, दिलीप बापूराव पाटील – पारोळा, डॉक्टर राजेंद्र एकनाथराव विखे पाटील – लोणी राहाता, धनराज देविदास विसपुते – पनवेल, भास्कर तानाजी भामरे – नाशिक यांनी शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत माघार घेतली आहे.
माघारी नंतर राजेंद्र विखेंची पोस्ट चर्चेत
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत माघार घेतल्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांची सोशल मीडियातील पोस्ट चर्चेत आली आहे. राजेंद्र विखे यांनी फेसबुक पोस्टमधून आपली नाराजी व्यक्त केली आहे.