ना. प्रतापराव जाधव यांची हाक बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सत्तापक्षाच्या विरोधात लाट असतानाही, त्या लाटेचा तडाखा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी महायुतीला बसू न देता मला विजयी केले. मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. २००९ पासून सातत्याने चौथ्यावेळी जळगाव जामोद व खामगाव या दोन विधानसभा मतदारसंघानी मला कुटुंबातील सदस्य समजून याहीवेळी भरभक्कम मतदान करून विजयात मोठा वाटा उचलला. त्याबद्दल त्यांच्याकडे आभार मानायला शब्द नाहीत, असे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रिय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले. आता निवडणूक संपली, आरोप-प्रत्यारोपांना तिलांजली देऊ, एकत्र येऊन बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू या… माझ्याकडून गत पंधरा वर्षांत ज्या काही उणिवा राहिल्या असतील, त्याही भरून काढू या, अशा मोठ्या मनाची भूमिका ना. जाधव यांनी जाहीर केली. ना. प्रतापराव जाधव यांनी सोशल माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये नमूद केले आहे की, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधू, भगिनींनो… आपण माझ्यावर विश्वास दाखवत सलग चौथ्यांदा मला लोकसभेत पाठवलं आणि परत आपली सेवा करण्याची संधी दिली तसेच आपल्याच कृपाशीर्वादाने केंद्रात मंत्रिपदही मिळाले, याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. राज्यभर विरोधी लाट असतानादेखील आपण विचलीत न होता माझ्यासोबत ठामपणे उभा राहिलात. माझ्याविरोधी होणाऱ्या चर्चाना आपण मला निवडून आणून पूर्णविराम दिला. सर्वच विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मागील पंधरा वर्षांपासून तर, जणू मी त्यांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणेच ही निवडणूक हाती घेतली होती. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्याला शब्दही थिटे पडतील. माझ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा नेहमीच राहिलेला आहे. मी तुमचा हक्काचा लोकप्रतिनीधी असलो तरी सबंध जिल्ह्याचाही लोकप्रतिनिधी आहे. परत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील पंधरा-वीस वर्षांत काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा माझ्याकडून काही जवळचे लोक व मतदार दुखावले गेले असतील, काहींची कामे होण्यात अडचणी निर्माण झाल्या असतील तर मी ती कामे करण्यास सदैव प्रयत्नशील राहिल व भविष्यात नक्कीच त्यात माझ्याकडून सुधारणा करेल. आपसातील हेवेदावे, वाद-विवाद विसरून आपणास परत विकासासाठी येऊन काम करायचे आहे. आपण माझ्या या हाकेला साद देणारच आहात, याची खात्री बाळगून सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो, असे त्यांनी नमूद केले.
Users Today : 61