मुंबई : शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी मुंबईत पार पडला. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला.
अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असे रामदास कदम यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे अजित पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत टीका केली आहे. यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, रामदास कदमजी आपण जोरात बोललात. मागुन आलेले “अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं” माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरींच्या या टीकेला आता आता रामदास कदम आणि शिंदे गटाचे नेते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली होती. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काही जागांवर महायुतीतील गोंधळामुळे उमेदवार जाहीर होऊ शकला नाही, त्याबाबत नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले रामदास कदम?
अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावं लागलं. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चालले असते, असे रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. तसेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. मात्र, अजित पवार महायुतीत आल्याने महायुतीतली नाराजी त्यांनी अशा पद्धतीने बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार काय बोलणार? हे पाहणेही महत्त्वाचे असणार आहे.