अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री होणार?

Khozmaster
2 Min Read

मुंबई : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यातच आता विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुद्धा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वीच कळविल्याची माहिती आहे. तसेच, यासंदर्भात अजित पवार यांनाही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले होते. तसेच, धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे, असे सांगत गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गाने करणे वारंवार शक्य होत नाही, असेही धर्मराबाबा आत्राम म्हणाले आहेत.

प्रकृतीचे कारण की आणखी काही?
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम हे इच्छुक होते. यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुद्धा केली होती. पण उमेदवारी न मिळाल्याने ते काहीसे नाराज होते. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षापासून त्यांचा दुरावा वाढल्याची चर्चा होती. अशातच त्यांनी आता गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांच्या निर्णयामागे नेमके प्रकृतीचे कारण आहे की आणखी काही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *