घरगुती वादातून पती-पत्नीनं घरातच संपवलं जीवन, तपास सुरु

Khozmaster
2 Min Read

मिरज : आरग (ता. मिरज) येथे पती-पत्नीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. दोघांत झालेल्या वादातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिरज ग्रामीण पोलिसांकडून दिली.

आकाश पोपट कोळी (वय २५), समृद्धी बबन कोळी (वय २३, दोघे रा. बहादूरवाडी भवानीनगर, ता. वाळवा) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने आरग गावात खळबळ उडाली होती.

आरग येथील गणपती मंदिराजवळील नाईक वस्तीवर दहा दिवसांपूर्वी भाड्याच्या खोलीत आकाश कोळी (वय २५) व समृद्धी कोळी (वय २३) हे दाम्पत्य वास्तव्यास आले होते. भवानीनगर ताकारी येथे आकाश कोळी हा वाहनचालक म्हणून काम करीत होता.
गुरुवारी रात्री नऊ वाजता दोघांनीही खोलीतील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

दोघांत झालेल्या वादातून आकाश कोळी हा गुरुवारी सायंकाळी बाहेर गेल्यानंतर समृद्धी कोळी हिने प्रथम ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आकाश याला घरी आल्यानंतर समजल्याने आकाशाने समृद्धीचा मृतदेह पाहून स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. याबाबत माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याएवढा दोघात वाद झाला की अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, याची पोलिस चौकशी करीत आहेत. प्रेमविवाह करून दोघेही आरग गावात येऊन राहिले असल्याचीही चर्चा सुरू होती. मिरज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू होते.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *